मस्साजोगचे सरपंच हत्या प्रकरणात मोठी घडामोड घडली आहे. १५ दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर प्रमुख आरोपी असल्याचा आरोप असलेल्या वाल्मीक कराडला न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे. आरोपीच्या वकिलांनी सीआयडीने मागितलेल्या पोलीस कोठडीला विरोध केला. यावर न्यायालयाने न्यायालयीन कोठडी देताच वकिलांनी जामिन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला आहे.
पवनचक्की कंपनीच्या खंडणी प्रकरणात अटकेत असणाऱ्या वाल्मीक कराडला १५ दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर आज कोर्टात हजर करण्यात आले होते. सरकारी वकील आणि वाल्मीक कराडच्या वकिलांचा युक्तिवाद संपल्यानंतर आज कोर्टाने कराडला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
पोलीस वाल्मीकवर मकोका लावण्याची तयारी करत आहेत. अशातच वाल्मीकच्या वकिलांनी जामिन अर्जाची खेळी खेळली आहे. खंडणी प्रकरणातील सुनावणीत कराडचा सहभाग कुठेही आला नसल्याचा युक्तीवाद वाल्मीक कराडचे वकील सिद्धेश्वर ठोंबरे यांनी केला. पोलिसांनी 10 दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. 15 दिवस तपास झाला पुन्हा कोठडी नको, असे म्हणणे आम्ही मांडले. कोर्टाने कोठडीचा पोलिसांचा अर्ज फेटाळला, असे वकिलांनी सांगितले.
तसेच खंडणी प्रकरणात जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे, त्यावर दोन-तीन दिवसात सुनावणी अपेक्षित आहे, असेही ते म्हणाले.
कराडवर खुनाचा गुन्हाही दाखल होणार?२९ नोव्हेंबरला मस्साजोग येथील अवादा कंपनीच्या पवन ऊर्जा प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांना दोन कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी वाल्मीक कराड याच्यावर गुन्हा दाखल असून, या गुन्ह्याचा तपास सीआयडीचे अधिकारी करत आहेत. या गुन्ह्यात वाल्मीक कराड याला यापूर्वी १४ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. वाल्मीक कराड याने खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला. या गुन्ह्यात वाल्मीक कराडसह विष्णू चाटे, सुदर्शन घुले हेदेखील आरोपी आहेत. २९ नोव्हेंबरला खंडणी मागितली होती. खंडणी दिली नाही, म्हणून त्याच प्रकरणातील पुढचे पाऊल हे ६ डिसेंबरला विष्णू चाटे व सुदर्शन घुले यांनी टाकले का? खुनाचा व कराडांचा काही संबंध आहे का, हे कराड व इतर आरोपींच्या चौकशीतून सीआयडीला स्पष्ट होणार आहे.