स. दा. खटपटेंचे कर्तृत्ववान सुपुत्र ‘अॅपी’ आडनावाला पुरून उरलेले. बघावं तेव्हा नव-नव्या प्रयोगात (पित्याच्या भाषेत उचापत्या!) अडकलेले. जिथं जगाचे विचार संपायचे, तिथून या पठ्ठ्याची कल्पना सुरू व्हायची. खरं तर लेकराचं नाव अप्पा ठेवलेलं. मोठेपणी लोक त्याला अप्पासाहेब म्हणतील, ही त्यांची अपेक्षा; पण यानं परस्पर नाव बदललं. ‘अप्पा’चं ‘अॅपी’ केलं. ‘स्मार्ट’ जमान्यात ‘अप्पा’पेक्षा ‘अॅप’ला अधिक महत्त्व म्हणून लाडानं ‘अॅपी’.. असो. ... तर असा हा अवलिया ‘अॅपी’ एक दिवस पेपर चाळत असताना थोरल्या बारामतीकरांवर आलेली एक कॉमेन्ट त्यानं वाचली. ‘काका काय बोलतात, याचा थांगपत्ता जगाला कधीच लागत नसतो.. कारण ते जे बोलतात, ते होत नसतं.. अन् ते जे घडवितात, ते कधीच बोलून दाखवत नसतात,’ असंच काहीबाही वाचताना ‘अॅपी’च्या डोक्यात कल्पनेचे धुमारे फुटले. ‘कॉमेन्ट’ डोक्यात ‘सेव्ह’ झाली. ‘थोरले काका बारामतीकर’ यांच्या अंतरंगाचं ठाव घेणारं ‘अॅप्लिकेशन’ तयार केलंच पाहिजे, याबद्दल त्याच्या मेंदूत ‘प्रोसेस’ सुरू झाली. अनेक राजकीय तज्ज्ञांशी ‘मेसेज’ची देवाण-घेवाण केली. त्यांच्या कुठल्या वाक्यातून कुठला अर्थ निघू शकतो, याचं ‘परफेक्ट फिडींग’ कॉम्प्युटरमध्ये डाऊनलोड झालं.. अन् पाहता-पाहता एक दिवस ‘अॅपी’चं अनोखं ‘अॅप’ उदयास आलं. त्याचं नाव ठेवलं ‘मोसामती’.. म्हणजे ‘मोठ्या साहेबांची मती.’... काका बोलत असताना मोबाईल त्यांच्यासमोर धरताच ‘मोसामती अॅप’वर त्या वाक्यामागचा खराखुरा अर्थ म्हणे उमटायचा. या प्रयोगाची शहानिशा करण्यासाठी ‘अॅपी’नं टीव्ही चॅनेल चालू केलं. योगायोगानं समोर काकाच झळकत होते. मग काय.. टीव्हीसमोर मोबाईल धरताच ‘अॅप’वर पटापट अक्षरं उमटू लागली . त्याचाच हा छ्र५ी शो...काका : (टीव्हीत) निरुपम हा मूर्ख माणूस. त्यांनी महाराष्ट्रासाठी काय काम केलं? केवळ पद आहे म्हणून त्यांचं नाव आहे. पद गेल्यावर कोण विचारतंय?मोसामती अॅप : (पटापट अक्षरं उमटू लागली) निरुपम हे खूप हुशार अन् चांगलं व्यक्तिमत्त्व. त्यांच्यामुळंच उलट मुंबईत आम्हाला चांगलं काम करण्याची संधी मिळतेय. जोपर्यंत त्यांच्याकडे पद आहे, तोपर्यंत आमचंही नाव अजून जास्त मोठं होईल. ते गेल्यावर मग आम्ही कुणाला विचारायचं?काका : एवढी वर्षे एकत्र राहणाऱ्यांची युती तुटली, याचं अतीव दु:ख वाटतं.मोसामती अॅप : युती तुटायला एवढी वर्षे लागली, याचं दु:ख वाटतं.काका : स्वातंत्र्य लढ्यात काँग्रेसजनांनी त्याग केला आहे, त्यामुळं मोदी सरकार काँग्रेसला संपवू शकत नाही.मोसामती अॅप : सध्या काँग्रेसजनच पक्षाचा स्वत:हून त्याग करीत निघाले आहेत. त्यामुळं काँग्रेसला संपविण्यासाठी दुसऱ्या कुणाची गरज नाही.काका : (शेवटचा बॉम्ब) महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुकीची शक्यता. मोसामती अॅप : (या वाक्यानंतर मात्र अॅपमध्ये तीन वेगवेगळे संदेश प्राप्त) च् आमचं ‘घड्याळ’ सोडून ‘कमळ’ धरणाऱ्यांनो निर्णय बदला. च् ‘हात’वाल्यांनो.. आमच्यासोबत ताठर न वागता आता तरी झेडपी महापालिकेत आमच्याशी आघाडी करा.च् ‘कमळ’वाल्यांनो.. काळजी करू नका. ‘मध्यावधी’ची फक्त शक्यता, खात्री नव्हे. कारण तो निर्णय माझ्याच हातात. आम्ही आहोतच तुमच्यासोबत.पण हे सारं वाचताना ‘अॅपी’चं डोक भणभणलं. त्याचा मोबाईलही हॅँगटला.- सचिन जवळकोटे
थोरल्या काकांचं ‘मोसामती’ अॅप !
By admin | Published: January 30, 2017 12:13 AM