ऑनलान लोकमतऔरंगाबाद, दि. २२ : मध्यप्रदेशातील खंडवा येथील एक गॅस एजन्सी फोडून सुमारे तीन लाख सात हजारांचा ऐवज लुटून औरंगाबादेत मुक्कामी आलेल्या आंतरराज्यीय दहा चोरट्यांच्या टोळीला मध्यवर्ती बसस्थानकासमोरील एका लॉजमध्ये छापा मारून पकडण्यात आले. मध्यप्रदेश पोलिसांच्या मदतीने क्रांतीचौक पोलीस ठाण्याच्या डी.बी. स्क्वॉडने शुक्रवारी पहाटे ही कारवाई केली. आरोपींकडून रोख ७० हजार रुपये आणि अन्य साहित्य जप्त करण्यात आले.
गोविंद चौधरी (३८), सोनीलाल प्रसाद (४८), धीरजकुमार प्रसाद (१८), जितेंद्र्र पासवान, मन्नालाल हुसेन, संजय ठाकूर, सुरेंद्र साहा, नरेंद्रकुमार खुदाई, सुनीलकुमार प्रसाद, दिनेश पासवान (सर्व रा. घोडासहन, जि. पूर्व चंपारण्य, बिहार) अशी चोरट्यांची नावे आहेत. पोलिसांनी सांगितले की, मध्यप्रदेशातील खंडवा येथील एक गॅस एजन्सी गुरुवारी रात्री या टोळीने फोडली. या एजन्सीमधील सुमारे ३ लाख ६ हजार ७०० रुपयांचा ऐवज लुटून ते रेल्वेने भुसावळ येथे गुरुवारी सकाळी आले. त्यानंतर एस. टी. बसने सायंकाळी औरंगाबादेत आले. मध्यवर्ती बसस्थानकासमोरील शिवशक्ती लॉजमध्ये ही टोळी मुक्कामी थांबली. दरम्यान, खंडवा येथील कोतवाली ठाण्यात या टोळीविरोधात गुन्हा दाखल झाला.
मध्यप्रदेश पोलीस टोळीचा माग काढत औरंगाबादेत पोहोचले. त्यानंतर क्रांतीचौक पोलिसांनाही या टोळीच्या संशयास्पद हालचालीची गुप्त माहिती मिळाली. पोलीस निरीक्षक नागनाथ कोडे, पोलीस उपनिरीक्षक संजय बनकर, पोहेकॉ. शेख रहीम, विनोद नितनवरे, गणेश वाघ, दीपक भवर, जावेद पठाण, सतीश जाधव, विशाल पाटील, युनूस शहा आणि महिला पोलीस कॉन्स्टेबल नुसरत फातेमा यांनी पहाटे ३.३० ते ४.०० वाजेच्या सुमारास शिवशक्ती लॉजवर छापा मारला.
यावेळी चोरटे दरवाजा उघडत नव्हते. शेवटी लॉज मॅनेजरकडून डुप्लिकेट चावी घेऊन पोलिसांनी दरवाजा उघडला. त्यानंतर सर्व आरोपींच्या मुसक्या आवळल्या. यावेळी त्यांच्याकडे रोख ७० हजार रुपये, एक कटर, टॉमी आणि इतर साहित्य मिळाले. या आरोपींना मध्यप्रदेश पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याचे फौजदार बनकर यांनी सांगितले.ती एजन्सी मंत्र्यांची....आरोपींनी फोडलेली गॅस एजन्सी ही एका मंत्र्यांच्या मालकीची असल्याची माहिती पोलीस निरीक्षक नागनाथ कोडे यांनी दिली. ते म्हणाले की, चोरट्यांनी मध्यप्रदेशातील खंडवा येथील ही एजन्सी फोडल्याची माहिती पोलिसांना कळताच पोलिसांनी तात्काळ चक्रे फिरवून आरोपींचा माग काढत औरंगाबाद गाठले. त्यानंतर आमच्याशी त्यांनी संपर्क साधला. पोलिसांनी शहरात मुक्क ामी आलेल्या आरोपींची माहिती काढली तेव्हा ही टोळी हाती लागली.