ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 5 - घरासमोर दुचाकी वाहन उभे करण्याचे स्वप्न तुम्ही बघत असाल तर तुम्हाला खिसा रिकामा करावा लागणार आहे. कारण दुचाकीसाठी करात राज्य शासनातर्फे वाढ करण्यात आली आहे. विशेष म्हणजे हा कर इंजिन क्षमतेवर आधारीत असणार आहे. याची अंमलबजावणी ७ जूनपासून होणार आहे.
महाराष्ट्र मोटार वाहन कर अधिनियम १९५८ मधील ६५ व्या कलम ३ व दुस-या अनुसूचीमधील वाहन करामध्ये ही सुधारणा करण्यात आली आहे. आतापर्यंत राज्यात सर्व प्रकारच्या दुचाकीसाठी सात टक्क्यांप्रमाणे कर आकारला जात होता. मात्र नवीन नियमानुसार दुचाकीच्या इंजिन क्षमतेनुसार कर आकारण्यात येत आहे. त्यामुळे ५० हजार किमतीची दुचाकी खरेदी करणाºया वाहनचालकाला चार ते पाच हजार रुपये इतका कर भरावा लागणार आहे. वाढलेल्या करामुळे वाहनचालकांच्या खिशाला चांगलीच झळ बसणार आहे.
७ जूनपासून अंमलबजावणी
ज्या वाहनांची इंजिन क्षमता ९९ सीसीपर्यंत आहे अशा वाहनांच्या किमतीच्या ८ टक्के कर भरावा लागणार आहे. ज्या वाहनांची इंजिन क्षमता ९९ सीसीपेक्षा जास्त व २९९ सीसी पर्यंत असेल अशा वाहनांना वाहनांच्या किमतीच्या ९ टक्के तर ज्या वाहनांची इंजिन क्षमता २९९ सीसीपेक्षा अधिक आहे, अशा वाहनांसाठी किमतीच्या १० टक्के कर आकारण्यात येणार आहे. हा वाढीव कर येत्या ७ जूनपासून लागू होणार असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून देण्यात आली आहे.