शिवसेना-भाजपा युतीतील तणाव : चार महापालिकांमधील सत्तेची समीकरणे बिघडणार संदीप प्रधान, मुंबईशिवसेना-भाजपा युती तुटली तर मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, औरंगाबाद, अंबरनाथ, बदलापूर अशा प्रमुख महापालिका व नगरपालिकांमधील किमान ३५ हजार कोटी रुपयांच्या आर्थिक अधिकारांवर या दोन्ही पक्षांना तुळशीपत्र ठेवायला लागेल, अशी चिन्हे दिसत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती फुटल्याने राज्याची सत्ता मिळवण्याचे स्वप्न भंग होतानाच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील असलेली सत्ता गमावण्याचा तुघलकी निर्णय दोन्ही पक्ष घेतील अशी शक्यता कमी असल्याचे बोलले जात आहे.मुंबई महापालिकेत दीर्घकाळ शिवसेना-भाजपाची सत्ता आहे. सध्या तेथे शिवसेनेचे ७५ तर भाजपाचे ३१ नगरसेवक आहेत. युती तुटल्यास शिवसेनेला सत्ता टिकवण्याकरिता मनसेच्या २८ नगरसेवकांची मदत घ्यावी लागेल. अथवा विरोधक या दोन्ही पक्षांना बाजूला सारून सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न करतील. मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प ३० हजार कोटी रुपयांचा आहे. ही महापालिका म्हणजे शिवसेनेकरिता जीव की प्राण आहे. त्यामुळे युती तुटली आणि मुंबई महापालिकेतील सत्ता शिवसेनेने गमावली तर तो शिवसेनेच्या जिव्हारी हल्ला असेल.ठाणे महापालिकेत शिवसेनेचे ५३ सदस्य असून काँग्रेसमधील सहा नगरसेवक काही दिवसांपूर्वी रवी फाटक यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत दाखल झाले. त्यापैकी चार शिवसेनेसोबत आहेत. भाजपाचे केवळ आठ तर मनसेचे सात नगरसेवक येथे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड युती तुटल्यावर २२०० कोटींचा अर्थसंकल्प असलेली ही महापालिका ताब्यात घेण्याची संधी सोडणार नाहीत. येथेही मनसेचा पाठिंबा मिळाला तर शिवसेनेची सत्ता कदाचित टिकून राहील. कल्याण-डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचे ३२, भाजपाचे नऊ तर मनसेचे २८ नगरसेवक आहेत. येथेही युती तुटली तर १६०० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प असलेली ही महापालिका आपल्या ताब्यात ठेवण्याकरिता शिवसेनेला खटपट करावी लागेल. पुढील वर्षी येथे निवडणूक असल्याने राज्यात फुटीमुळे युतीची सत्ता येणार नसेल तर काही नगरसेवक काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बाजूला वळू शकतात.औरंगाबाद महापालिकेत शिवसेनेचे ३०, भाजपाचे १५ तर मनसेचा एक नगरसेवक आहे. काही अपक्ष व भारिप-बहुजन महासंघ यांचा पाठिंबा युतीला आहे. युती फुटली तर येथील राजकीय समीकरणे बिघडण्याची शक्यता आहे. या महापालिकेचा अर्थसंकल्प ७९० कोटींचा आहे. नगरपालिकांमध्येही एकत्रअंबरनाथ व बदलापूर नगरपालिकांमध्येही युतीची सत्ता असून या दोन्ही नगरपालिकांचा अर्थसंकल्प प्रत्येकी २०० कोटींचा आहे. अंबरनाथमध्ये शिवसेनेचे १७, भाजपाचा एक तर मनसेचे सात सदस्य आहेत. बदलापूरमध्ये शिवसेनेचे १३, भाजपाचे सात तर मनसेचे तीन सदस्य आहेत. महापालिकांचे वार्षिक अर्थसंकल्पमुंबई - ३०,००० कोटी ठाणे- २२०० कोटीकल्याण-डोंबिवली - १६०० कोटीऔरंगाबाद - ७९० कोटी
अंबरनाथ आणि बदलापूर नगरपालिका - २०० कोटी