- पद्मजा जांगडेमहिलांच्या सौंदर्याचे लेणे म्हणून मंगळसूत्र, जोडवी, कुंकू, सिंदूर, बांगड्या आदींचा आवर्जून उल्लेख केला जातो. हिंदू धर्मात याला विशेष महत्त्वही आहे, मात्र काळानुरूप सौंदर्याच्या नव्हे सौभाग्याच्या या लेण्याला मॉडर्न टच मिळाला आहे. चाळीस-पन्नासच्या दशकात चंदन, राख अथवा लाल भडक कुंकू लावण्याची पद्धत होती. सत्तरच्या दशकात यात विविध रंगांची भर पडली. ऐंशीच्या दशकात मरुन, चमकदार, खड्यांच्या टिकल्यांची फॅशन आली. तोपर्यंत या कुंकू/टिकलीचा आकार गोलच होता. मात्र नव्वदीच्या उंबरठ्यावर येताच, विविध रंगाबरोबरच टिकल्यांच्या विविध आकाराला पसंती मिळाली. अंडाकृती, लंबगोलाकार, चांदणीच्या आकाराबरोबरच वेगवेगळ्या डिझाईन्सच्या टिकल्यांनी फॅशनच्या दुनियेत हक्काची जागा मिळवली. आजकाल आजीवर्गाकडून दररोज कुंकू वा टिकली लावली जात असली तरी तरुणींसाठी सणावारी घालण्याजोगा, पारंपरिक वेषभूषेचा हा एक प्रकार आहे. आऊटफिटनुसार टिकलीचा आकार, रंग आणि डिझाईन्स हे सध्या इन डिमांड आहेत. जाहिरातीचे प्रभावी माध्यम म्हणून छोट्या पडद्यावरील मालिका नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. म्हणूनच एखादी मालिका सुरू झाली की स्त्री व्यक्तिरेखेची ड्रेसिंग स्टाइल, हेअरकट, गेटअप, अॅसिसरीजपासून अगदी बॅग्ज, शूज लगेच मार्केट कॅप्चर करतात. मध्यंतरी ‘कमोलिका’च्या बिंदी स्टाईलने तरुणींमध्ये भलतीच क्रेझ निर्माण केली होती. तर १९६९ च्या दशकात अभिनेत्री मुुमताजने ‘बिंदीया चमके गी...’ म्हणत दर्शकांना अक्षरश: वेड लावलं. ‘हम दिल दे चुके’ मधल्या ऐश्वर्याच्या बिंदी स्टाईलने तर तरुणींबरोबरच अनेक तरुणांनाही भुरळ पाडली.सध्या काम्प्युटराईज्ड टिकल्यांची क्रेझ आहे. या टिकल्यांचे पाकीट अवघ्या पाच रुपयांपासून उपलब्ध असले तरी आकर्षक डिझाईनसाठी, खास वधूसाठी असलेल्या एका टिकलीसाठी २०० ते ५०० रुपये खर्च करण्यासही महिला मागेपुढे पाहात नाहीत. भारतात २०१५ मध्ये पहिल्यांदा अभिनेत्री प्रभलिन कौर व टिकली डिझायनर अरुणा भट यांनी आॅनलाइन ‘बिंदी स्टोअर’ सुरू केले. त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नसला तरी १ लाख डिझाईन्सच्या टिकल्या बनवून भट यांनी लिम्का बुक आॅफ रेकॉर्डमध्ये विक्रम नोंदवला आहे. आॅनलाइन बिंदी स्टोअर पुन्हा सुरू करण्याचा त्यांचा विचार आहे.ऐंशीच्या दशकात जाहिरातींतील ७५ टक्के व्यक्तिरेखा टिकली लावलेल्या दिसायच्या, २००० मध्ये हे प्रमाण ३० टक्क्यांवर आले. खास महिलांसाठी प्रकाशित होणाऱ्या साप्ताहिक, मासिकांबाबतही हेच म्हणावे लागेल. सत्तरीच्या दशकात जाहिरातबाजी करणाऱ्या महिलांपैकी ५० टक्के महिला या टिकली लावलेल्या दिसायच्या. मात्र आज हे प्रमाण निव्वळ ५ ते ७ टक्क्यांवर आले आहे.
बिंदीया चमके गी...
By admin | Published: April 20, 2017 3:33 AM