नाशिक : सह्याद्रीच्या पर्वतरांगेने नटलेल्या कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्यातील समृध्द वृक्षसंपदा जैवविविधतेची जोपासणा करत आहे. नैसर्गिक जैवविविधतेमधील महत्त्वाचा व आगळावेगळा वैशिष्ट्यपूर्ण किटक अर्थात काजवा लुकलुकतो. त्याचे हे लुकलुकणे जरी मादीला आकर्षित करण्यासाठी असले तरी त्यांचा अंधारातील हा खेळ माणसालाही तितकाच आकर्षित करतो. त्यामुळेच नाशिकपासून अगदी ७० किलोमीटरवरील भंडारदरा परिसरातील कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्याच्या परिसरात पर्यटकांची महिनाभर जत्रा भरते. यावेळी काही मद्यपी पर्यटक धिंगाणा घालत काजव्यांना त्रास देण्याचाही प्रयत्न करतात. ज्या झाडांवर काजवे चमकतात त्या झाडांवर चढून काजवे धरण्याचा अट्टहास काजव्यांच्या जीवावर उठत आहे.
निसर्गात बागडताना त्याचा आनंद लुटताना बेभान होऊन चालणार नाही. निसर्ग व त्यामधील जैवविविधता वाचवायची असेल तर मानवाला भानावर यावेच लागणार आहे. कारण वैश्विक तपमान वृध्दीच्या स्वरुपात पर्यावरणाचा होणाऱ्या -हासाचे ‘काजवे’ जगापुढे चमकायला लागले आहे, हे तितकेच खरे. अभयारण्यातील वृक्षसंपदेवर जोपासना होणा-या या किटकामुळे या अभयारण्याने वेगळे नावलौकिक मिळविले आहे. काजवारुपी प्रकाशफुलांच्या आविष्कारासाठी हे अभयारण्य राज्यात प्रसिध्द आहे. हा आविष्कार अभयारण्यातील वृक्षसंपदेवर लवकरच बघावयास मिळणार आहे. त्यामुळे निसर्गप्रेमींना याचे वेध लागण्यास सुरूवात झाली आहे. काजव्यांच्या दुनियेत सावधपणे पाय ठेवण्याची गरज आहे.
वैशाख सरू झाला की या अभयारण्यामधील भंडारदरा ते राजूरपर्यंतच्या गावांच्या परिसरातील वातावरण बदलू लागते अन् मग निसर्गप्रेमींना चाहूल लागते ती सह्याद्रीच्या गिरीकंदात झगमणाºया काजव्यांच्या दुनियेचे. वैशाखनंतर काजव्यांची उत्पत्तीचा काळ जवळ येतो. रोहिणी, मृग नक्षत्रामध्ये काजवे अधिक चमकू लागतात. त्याअगोदर वळवाचा पाऊस झाला की काजव्यांच्या या अद्भूत दुनियेने जणू अभयारण्यातील वृक्षसंपदा रात्रीच्या काळोखातही उजळून निघते. अहमदनगरच्या तालुक्यामधील कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यामधील घाटघर-साम्रद व भंडारदरा-रतनवाडी या मार्गांवर काजव्यांची दुनिया पहावयास मिळते. हा परिसर जरी इगतपुरी व नाशिकपासून अगदी जवळ आहे. त्यामुळे मुंबईकर, नाशिककर तसेच पुणेकरांनाही संगमनेर-राजुरमार्गे हे अभयारण्य सोईस्कर पडते. राहिणी किंवा मृगाच्या सरी बरसल्या की, जणू नभोमंडळातील तारकादळेच अभयारण्याच्या कुशीत उतरल्याचा भास होतो. चहुबाजूला विविध प्रजातीच्या झाडांवर काळ्याकुट्ट अंधारात काजव्यारुपी प्रकाशफुलांचा लखलखाट पहावयास मिळतो. निसर्गाची ही अद्भूत किमया केवळ डोळ्यांच्या कॅमे-यात टिपता येते आणि या प्रकाशफुलांनी उजळलेले झाड डोळ्यांनी न्याहाळण्याची मजा काही औरच असते.
दरवर्षी अभयारण्यात ही दुनिया अनुभवण्यासाठी महिनाभर निसर्गप्रेमींची वर्दळ पहावयास मिळते. मुंबईकरांसह नाशिककर, पुणेकर व नगरकर मोठ्या संख्येने हजेरी लावतात. या भागातील आदिवासी लोकांना रोजगारदेखील काही प्रमाणात उपलब्ध होण्यास मदत होते. लक्ष-लक्ष काजव्यांचा नैसर्गिक आविष्कार डोळ्यांची पारणे फेडणारा ठरतो; मात्र काही विकृत प्रवृत्तीच्या लोकांचे डोळे जणू हा आविष्कार बघून विस्फारतात की काय? अशी शंका येते. अशा विकृतांकडून अशा अद्भूत नजारा अनुभवला तर जात नाही मात्र तो नजारा बिघडविण्याचा प्रयत्न केला जातो. यावर्षी अशा विकृ त प्रवृत्तीच्या लोकांवर नाशिक वन्यजीव विभागाचा ‘वॉच’ राहणार आहे. ग्रामस्थ व गाईडच्या मदतीने वनविभाग पर्यटकांच्या धिंगाण्याला चाप लावणार आहे.
काजव्यांची संख्या वातावरणातील दमटपणावर अवलंबून आहे. मे महिन्याच्या पंधरवड्यानंतर काजव्यांची उत्पत्तीला प्रारंभ होतो; मात्र जुनच्या मध्यापर्यंत काजव्यांची संख्या लाखोंच्या पुढे गेलेली दिसून येते. पावसाच्या प्रारंभी काजवे मोठ्या प्रमाणात वाढतात.त्यांच्या प्रजनन काळ येतो धोक्यातमोर लांडोरला आकर्षित करण्यासाठी पिसारा फुलवून नृत्य करतो तसाचा काजवा हा किटकही आपल्या मादीला आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असतो. नर काजवा चमचम करत मादीला आपल्याकडे आकर्षित करत असतो म्हणजेच हा खरा तर या किटकाचा प्रजननाचा काळ असतो. यामुळे निसर्गप्रेमींनी या काजव्यांच्या अद्भूत दुुनियेत प्रवेश करतात तितकीच सावधगिरी व खबरदारी बाळगायला हवी अन्यथा दुर्मीळ झालेला काजवा कायमचा लुप्त होण्यास वेळ लागणार नाही हे तितकेच खरे.