अकोला : जगात जैवतंत्रज्ञानावर आधारित शेतीचे दिवस आले आहेत. सर्वत्र या तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे; परंतु या विषयाचा पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यास विदर्भाला ४४ वर्षे प्रतीक्षा करावी लागली. आता पहिले शासकीय महाविद्यालय विदर्भाला मिळाले असून, पदवी अभ्याक्रमाची पहिली तुकडी २0१६-१७ मध्ये या महाविद्यालयातून बाहेर पडेल. विदर्भाची व्याप्ती बघता आणखी दोन महाविद्यालये हवी असल्याने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने याबाबत प्रस्ताव तयार करण्याची गरज असल्याची तज्ज्ञांची मतं आहेत. जैवतंत्रज्ञानाचे क्षितिज दिवसागणिक वाढत असून, परजणुक प्रवेशित वाणनिर्मिती, जनुकीय चिन्हाच्या मदतीने पीक पैदास पद्धती आदी तंत्रज्ञानामुळे नवीन वाणांची निर्मिती जलदगतीने होण्यास मदत होत आहे. त्यामुळे नजीकच्या काळात कृषी जैवतंत्रज्ञानामध्ये प्रगत मनुष्यबळाची गरज भासणार आहे. तथापि, या आधुनिक तंत्रज्ञानापासून विदर्भातील विद्यार्थी अद्याप वंचित होते. मागील शैक्षिणक वर्षातच डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला जैवतंत्रज्ञान महाविद्यालय मिळाले. यासाठी विद्यापीठाला ४४ वर्षे प्रतीक्षा करावी लागली. यवतमाळ येथे जैवतंत्रज्ञान पदवी महाविद्यालय सुरू असूून, सध्या ४0 विद्यार्थी जैवतंत्रज्ञानाचा आधुनिक अभ्यास येथे करीत आहेत.या विद्यार्थ्यांना जैवतंत्रज्ञान पदवी तर दिली जाईलच, शिवाय त्यांना स्वयंरोजगारासाठी उद्युक्त केले जाणार आहे. या विद्यार्थ्यांना कृषी विद्यापीठाच्या अकोला मुख्यालयी जैवतंत्रज्ञान विषयात पदव्युत्तर अभ्याक्रमाची सोय आहे. कृषी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात अकरा जिलंचा समावेश आहे. या जिलंचा मोठा परिसर, पिकांची विविधता व हवामानातील बदल आदी बाबी लक्षात घेता, कृषी विद्यापीठामध्ये जैवतंत्रज्ञानाचे घटक महाविद्यालय होणे गरजेचे होते. कृषी विद्यापीठानेदेखील यासाठी प्रस्ताव सादर केले होते; पण त्यासाठी बरीच वर्षे लागली. विदर्भाची हीच व्याप्ती लक्षात घेऊन पूर्व विदर्भ, वाशिम व अचलपूर येथे जैवतंत्रज्ञान महाविद्यालय सुरू करण्याची गरज आहे. यासंदर्भात डॉ व्ही एम भाले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी विदर्भाची व्याप्ती बघता जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाची आणखी गरज असल्याचे म्हटले.
आता जैवशेतीच तारणार!
By admin | Published: April 21, 2015 12:21 AM