मेहकर : अपारंपरिक उर्जा व विद्युत अभियांत्रिकी विभाग डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोला यांचेद्वारा विकसीत केलेल्या सुधारीत बायोगॅस संयत्रापासून ईतर कोणत्याही सयंत्राच्या तुलनेत ३0 टक्के अधिक गॅस मिळतो. त्यामुळे सुधारित बायोगॅस सयंत्र हे इंधन टंचाईवर रामबाण उपाय ठरत असल्यचा अनुभव मेहकर तालुक्यात येत आहे. ग्रामीण भागात आणि शहरात सुद्धा दुध- दुभत्यासाठी गाई, म्हशी या सारखे दुधाळ जनावरे पाळण्यात येतात. ग्रामीण भागात असलेले अरुंद रस्ते आणि मार्यादीत जागा यामुळे जागेअभावी गोबर गॅस सयंत्र बांधकामासाठी अडचणी येत होत्या. परंतू आज अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि यांत्रिकीकरणामुळे बर्याच ठिकाणी आधुनिक पद्धतीचे घर बांधकाम करुन गुरांचा गोठा यासह शेतामध्येच वस्ती करण्याकडे शेतकरी वर्गाचा ओढा वाढला आहे. शेतकरी वर्गात आजही बायोगॅस बाबत पुरेशी जागरुकता नसल्यामुळे बायोगॅसचा वापर अत्यंत कमी आहे. बायोगॅस बाबत तांत्रिक माहिती देण्यासाठी सक्षम यंत्रणा नसणे, दररोजचे मानवी कष्ट, शेतमजुराची टंचाई, बायोगॅस सयंत्रामध्ये शेण-पाणी टाकण्यात सातत्य नसल्यामुळे सयंत्रापासुन पुर्ण क्षमतेने गॅस निर्मीती न होणे अशा विविध कारणांमुळे शेतकरी वर्गाने बायोगॅस तंत्रज्ञानाकडे पाठ फिरविल्याचे दिसत आहे. यावर उत्तम पर्याय म्हणुन अपारंपरिक उर्जा व विद्युत अभियांत्रिकी विभाग डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोला यांचेद्वारा सुधारित बायोगॅस सयंत्र विकसीत करण्यात आलेले आहे. ईतर कोणत्याही सयंत्राच्या तुलनेत ३0 टक्के अधिक गॅस या सुधारित बायोगॅस सयंत्रापासुन मिळतो. बुलडाणा जिल्ह्यातील केवळ मेहकर तालुक्यातील फर्दापूर, कळपविहिर, वडगाव माळी, नायगाव दत्तापूर, देऊळगाव साकर्शा या गावांमध्ये सदर सुधारित बायोगॅस सयंत्र बांधण्यात आले असून ते पुर्ण क्षमतेने कार्यान्वीत करण्यात आले आहेत. तसेच आता मेहकर तालुक्यातील कल्याणा येथे तीन, गजरखेड येथे दोन, शेंदला येथे एक व मेहकर येथे दोन बायोगॅस सयंत्राचे बांधकाम ज्ञानेश्वर तायडे हे करीत आहेत. या बायोगॅस सयंत्रामुळे तालुक्यातील शेतकर्यांना मोठा फायद होणार असल्याचे बोलले जात आहे. ** असे आहे सुधारित स्वरूप सुधारित बायोगॅस सयंत्रात एक फुट व्यासाचा व साडे आठ फुट लांबीचा आर.सी.सी. पाईप असल्यामुळे शेण-पाणी यांचे मिश्रण करावे लागत नाही. यामुळे श्रमाची आणि वेळेची बचत होते. सुधारित बायोगॅस सयंत्रात केवळ गुरांचे शेणच टाकले जात असल्याने, परिणामी ३0 टक्के अधिक गॅस उत्पादन होते. तसेच यापासुन मिळालेली मळी घट्ट असुन ती शेतात वाहुन नेण्यास सोयीची आहे. यामुळे जमीनीचा पोत सुधारण्यासही मदत ठरते. बायोगॅस सयंत्र ते स्वयंपाकघर यांचे अंतर तब्बल ७00 ते १ हजार फुटापर्यंत असलेतरीही गॅस पुर्ण दाबाने मिळतो.