मुंबई : रुग्णालयातील वेगळ्या केलेल्या ओल्या कचऱ्यापासून वांद्रे इथल्या भाभा रुग्णालयात गॅसनिर्मिती केली जाणार आहे. त्यासाठी या रुग्णालयात बायोगॅस प्लान्ट बसवण्यात आला आहे. अशा पद्धतीचा प्लान्ट बसवणारे हे महापालिकेचे पहिले रुग्णालय आहे. मुंबई महापालिका आयुक्त अजय मेहता यांच्या हस्ते शनिवारी या प्लान्टचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी खासदार पूनम महाजनही उपस्थित होत्या. या प्रकल्पात एका वेळी २०० किलो कचऱ्यातून २४ तासांत १६ घ.मी. गॅसनिर्मिती म्हणजेच ८ किलोग्रॅम एलपीजीची निर्मिती करण्यात येणार आहे. यासाठी ४० हजार लीटर क्षमतेची पाचक टाकी उभारण्यात आली आहे. या टाकीतून निर्माण होणारा गॅस भाभा रुग्णालयाच्या नवव्या मजल्यावर असणाऱ्या कॅन्टिनला मोफत देण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे कचऱ्याची विल्हेवाट लागणार असून महापालिकेच्या वाहन, इंधन, कर्मचारी या सर्वांची बचत होणार आहे. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच्या माध्यमातून हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
भाभा रुग्णालयात बायोगॅस प्लान्ट
By admin | Published: September 18, 2016 1:20 AM