हर्षनंदन वाघ बुलडाणा, दि. १२- जिल्हा परिषदेच्या १४४८ शाळांमध्ये प्रायोगिक तत्वावर बायोमेट्रीक हजेरी प्रणालीची अंमलबजावणी येत्या मंगळवापासून करण्यात येणार आहे. राज्यात २0११ मध्ये पडपडताळणी मोहीम राबविण्यात आली. यामध्ये अनेक शाळांनी अनुदान लाटण्यासाठी बोगस विद्यार्थी दाखविल्याचे उघड झाले होते. त्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभाग सतर्क झाला आहे. विद्यार्थी सरल फार्म द्वारे देखील बोगस विद्यार्थी समोर येणार आहे. बायोमेट्रीक प्रणाली शाळांमध्ये हजेरीसाठी लावण्यात येईल. त्यामध्ये पहिल्या टप्प्यात शिक्षकांच्या उपस्थितीची नोंद करण्याची सोय केली जाईल. नंतर या प्रणालीद्वारे विद्यार्थ्यांच्या नोंदी घेण्यात येतील. शिक्षण विभागाने प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र धोरण हाती घेतले. त्याचा एक भाग म्हणून नव्याने अनेक योजना राबविण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी, आधार क्रमांक अशा तांत्रिक बाबी पूर्ण झाल्या की, पुढील वर्षापासून बायोमेट्रीक प्रणालीची अंमलबजावणी होईल. म्हणून सध्या विद्यार्थ्यांची नोंदणी ऑनलाईन सरल फार्मद्वारे केली जात आहे. तसेच प्रत्येक शाळेत सर्व वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी आधार कार्ड काढले की नाही याची माहिती मागविली जात आहे. सध्या प्रत्येक शाळामध्ये अध्यापनाचे काम कमी आणि विद्यार्थ्यांचे सरल, आधार अशी माहिती जमा करण्यात शिक्षकांचा वेळ जात आहे. पुन्हा मंगळवार पासून शाळांमध्ये बायोमेट्रीक हजेरी सुरु झाल्यानंतर शिक्षक, विद्यार्थी यांची डोकेदुखी चांगलीच वाढणार आहे. बायोमेट्रिक पध्दतीव्दारे मोबाईलच्या ट्रिम या अँपव्दारे शिक्षक व विद्यार्थ्यांची हजेरी घेण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी दीपा मुधोळ यांनी ९ नोव्हेंबर रोजी दिले आहेत.
बुलडाणा जिल्ह्यात मंगळवारपासून बायोमेट्रीक हजेरी प्रणाली
By admin | Published: November 13, 2016 2:08 AM