- महेश चेमटे मुंबई : मध्य रेल्वेच्या ५,५३२ बोगीत बायोटॉयलेट कार्यान्वित करण्यात आले आहेत. मध्य रेल्वेत एकूण १४ हजार ५६५ बायोटॉयलेट बसविण्यात येणार आहेत. त्यापैकी यंदा (२०१७-१८) वर्षासाठी २,४०० बायोटॉयलेट बसविण्याचे लक्ष्य दिले आहे. त्यापैकी जुलैपर्यंत ४२५ बायोटॉयलेट बसविण्यात आले आहेत.‘स्वच्छ रेल्वे-स्वच्छ भारत’ उपक्रमांतर्गत देशातील सर्व रेल्वे विभागातील लांब पल्ल्यांच्या ट्रेनमध्ये एकूण १ लाख ४० हजार बायोटॉयलेट बसविण्यात येणार आहेत. हे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी २०१९ पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. रेल्वे बजेटमध्ये बायोटॉयलेटसाठी विशेष तरतूद केली आहे. त्यानुसार, जुलै २०१७ पर्यंत ५,५३२ बायोटॉयलेट कार्यान्वित झाल्याची माहिती रेल्वे सूत्रांनी दिली.बायोटॉयलेट विकसित करण्यासाठी, रेल्वे आणि डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट आॅर्गनायझेशन (डीआरडीओ) यांच्यात करार करण्यात आला आहे. यानुसार, २०१९ पर्यंत लांब पल्ल्यांच्या गाड्यांमधून पारंपरिक शौचगृह हद्दपार करण्यात येणार आहे. त्या जागी बायोटॉयलेट बसविण्यात येणार आहे. स्टेनलेस स्टील बनावटीच्या ६ चेंबर्ससहीत बायोटॉयलेटच्या संचाचे मूल्य ९० हजार इतके आहे.लांब पल्ल्यांच्या प्रवाशांकडून प्रवासादरम्यान पारंपरिक शौचालयाच्या अनेक तक्रारी मिळत होत्या. बायोटॉयलेटमुळे प्रवाशांच्या तक्रारींचे निवारण होणार असल्याचा दावा रेल्वेकडून करण्यात येत आहे. बायोटॉयलेटमुळे पाण्याचादेखील योग्य वापर होतो. परिणामी, पाण्याचे संवर्धनदेखील करता येणे शक्य असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.
मध्य रेल्वेच्या साडेपाच हजार बोगींत ‘बायोटॉयलेट’, २०१७-१८ अखेर २,४०० टॉयलेट कार्यान्वित करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 5:00 AM