मुंबई : महाराष्ट्र पक्षिमित्र संघटनेच्या वतीने १६ ते २६ जानेवारीदरम्यान राज्यभरात महापक्षिगणनेचे आयोजन करण्यात आले आहे. या गणनेचे यंदा ७वे वर्ष आहे. आजपर्यंतच्या गणनेत ३३८ पक्ष्यांच्या प्रजातींची नोंद झाली आहे. ही नोंद सध्याच्या प्रचलित नोंदीपेक्षा २०० प्रजातींनी कमी आहे.महाराष्ट्र राज्याच्या प्रचलित सूचीनुसार राज्यात ५४० प्रजातींचे पक्षी नोंदविण्यात आले. इला फाउंडेशनने प्रसिद्ध केलेल्या ‘बडर््स आॅफ महाराष्ट्र’ अहवालाच्या सूचीमध्ये ५६८ पक्ष्यांच्या प्रजातींची नोंद आहे. महाराष्ट्र पक्षिमित्र संघटनेची यंदाची गणना जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात होणार आहे. या वर्षी मानवी वस्तीमधील पक्षी, अर्बन बर्ड विशेषकरून चिमणीच्या गणनेवर भर देण्यात येणार आहे. गणनेदरम्यान मोबाइल टॉवर्सचा चिमण्यांवर काय परिणाम होतो? याचाही अभ्यास केला जाणार आहे. गणना करताना गणना क्षेत्रात २०० मीटर परिसरात मोबाइल टॉवर असेल तर त्याची नोंद करणे आवश्यक असणार आहे. या गणनेचा अहवाल ३१ जानेवारीपूर्वी संघटनेकडे सादर करणे आवश्यक असणार आहे. पक्षिगणना करताना घ्यायची खबरदारी..- पक्षिगणना आपल्या सोयीच्या कोणत्याही एका दिवशी करावी.- परिसरातील अधिवास निवडावेत आणि जंगलांना प्राधान्य द्यावे.- गणनेसाठी सकाळी ६.३० ते १० आणि सायंकाळी ४ ते ७.३० या योग्य वेळा आहेत.- सायंकाळच्या सत्रात निशाचर पक्ष्यांवर भर द्यावा.- ज्या पक्ष्यांची ओळख खात्रीपूर्वक झाली आहे; अशा पक्ष्यांचाच नोंदीत समावेश करावा.- पक्ष्यांची संख्या मोघम टाळावी.- एकाच ठिकाणची गणना दोन वेगळ्या गटाने करू नये.- गणनेत शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि शिक्षक यांचा समावेश प्रामुख्याने करावा.- ज्येष्ठ नागरिक संघटनांचीही मदत घ्यावी.- गणनेत सहभागी होण्यासाठी वय, शिक्षण आणि व्यवसायाची अट नाही. गणनेसंदर्भातील माहितीसाठी www.pakshimitra.org या संकतेस्थळावर संपर्क साधावा.
महाराष्ट्रात पक्षी महागणना
By admin | Published: January 13, 2016 2:05 AM