मुंबई : दोन दिवसांपूर्वी परभणीमध्ये दगावलेल्या 800 कोंबड्या य़ा बर्ड फ्ल्यूमुळेच असल्याचे निष्पन्न झाल्याने खळबळ उडालेली असतानाच आता राज्यावर बर्ड फ्ल्यूचे मोठे संकट घोंघावू लागले आहे. बर्ड फ्ल्यूने पाच जिल्ह्य़ांत शिरकाव केला आहे.
परभणीसह मुंबई, ठाणे, दापोली आणि बीडमध्ये बर्ड फ्ल्यूची लागण झाली आहे. मुंबई, ठाणे, परभणी, दापोली आणि बीडमध्ये कावळे, पोपट आणि कोंबड्यांचा मृत्यू झाला होता. या पक्ष्यांचे नमुने भोपाळच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. या प्रयोगशाळेचा अहवाल आला असून या पक्ष्यांचा मृत्यू बर्ड फ्ल्यूने झाल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे प्रशासन अॅलर्ट झालं असून सर्वांना सतर्कतेचा आदेश देण्यात आला आहे.
परभणी तालुक्यातील मुरुंबा येथे एका पोल्ट्री फार्ममध्ये दोन दिवसांपूर्वी 800 कोंबड्यांचा मृत्यू झाला होता. या कोंबड्या बर्ड फ्लूनेच दगावल्याने निष्पन्न झाल्याने राज्यभरात खळबळ उडाली आहे. यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज बर्ड फ्लू परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेणार आहेत.
परभणी येथील पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांच्या पथकाने पोल्ट्री फार्ममध्ये जाऊन कोंबड्या ताब्यात घेतल्या होत्या. त्यांचे नमुने पुणे येथील अन्वेषण विभागाकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. या तपासणीच्या अहवालात या कोबड्यांचा मृत्यू हा बर्ड फ्लूनेच झाला असल्याचं स्पष्ट झालं आहे. यानंतर जिल्हा प्रशासनाने तत्काळ पावलं उचलायला सुरुवात केली आहे.
मुंबईत अद्याप नाही....दरम्यान, मुंबईत कावळे मृत्यूमुखी पडल्याने बर्ड फ्लू आल्याच्या अफवा पसरू लागल्या होत्या. ठाण्याच्या बगळे व पोपटांमध्ये बर्ड फ्लूचे विषाणू सापडले आहेत. रोगाबाबत शास्त्रीय माहितीचा आधार नसलेले गैरसमज, अफवा पसरविण्यात येऊ नयेत. समस्या असेल, तर पशुसंवर्धन आयुक्तालयाच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करून त्याची माहिती द्यावी. मुंबईत आतापर्यंत बर्ड फ्लू रोगामुळे पक्ष्यांचे मृत्यू झाल्याचे आढळून आलेले नाही, तरीही दक्षता घेणे आवश्यक आहे, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून ५ राज्यांतून बर्ड फ्लूने सुमारे २५ हजार देशी-विदेशी पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. ठाण्यातही १५ पाणबगळ्यांचा संशयास्पदरीतीने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या पक्ष्यांना कुठल्याही जखमा आढळून आल्या नाहीत. विशेष म्हणजे, मांजर, कुत्रे, कावळे यांनी या मृतदेहांना तोंडही लावले नाही. त्यामुळे गूढ वाढले आहे.