देहूगाव : वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे हा जगाला संदेश देणाऱ्या जगद्गुरू श्री संत तुकाराममहाराजांच्या श्रीक्षेत्र देहूगावात इंद्रायणी नदीच्या काठावर सुरू असलेल्या विविध विकासकामांमुळे काही ठिकाणी पर्यावरणाची हानी होत असून, नदीकाठच्या पक्ष्यांचे निवारे उद्ध्वस्त होण्याची भीती निर्माण झाली आहे.इंद्रायणी नदीवर ११२ मीटर रुंद व ७.५ मीटर रुंदीच्या पुलांचे आणि त्यांना जोडणाऱ्या दोन १०० फूट रस्त्याचे कामदेखील सुरू आहे. आणखी एका पुलाचे बांधकाम प्रस्तावित आहे. वारकऱ्यांची सोय, पूर नियंत्रण आणि नदीचे सौंदर्य वाढावे, यासाठी पूर्व किनाऱ्यावर घाट बांधण्यात येत आहे. याच घाटाला लागूनच स्मशानभूमी व उर्वरित घाटाचे बांधकाम करण्यात येणार आहे. मात्र, हे काम करताना किनाऱ्यावरील करंज व इतर जंगली झाडे यांची काही अंशी कत्तल करावी लागली. या झाडांवर पक्ष्याची ती घरटी होती. दररोज सकाळी सहाच्या सुमारास व सायंकाळी किंवा कातरवेळी या पक्ष्यांचे थवे आकाशात झेपावत दिसत असत. वृक्षतोडीमुळे पक्ष्यांचे निवारेच नष्ट होण्याची भीती निसर्गप्रेमी व्यक्त करीत आहे.देहूगावामध्ये डीजे बंदीचा ठराव होऊनही मोठ्या आवाजाचे डीजे वाजविले जातात. फटाक्यांच्या आतषबाजीमुळेही येथील शांततेचा भंग होत असून, या पक्ष्याच्या निवाऱ्यांवर परिणामी होत असल्याचे जाणवत आहे. श्री संत तुकाराममहाराजांच्या गाथा याच परिसरात बुडविल्या असल्याने या परिसराला मोठा इतिहास आहे. शांत जागा म्हणूनही ही जागा प्रसिद्ध होती. मात्र, अलीकडे या भागातील शांतताच हरवली आहे. (वार्ताहर)झाडांची कत्तल होत आहे. त्याचप्रमाणे लग्नसराईमुळे फटाक्यांच्या आवाजाच्या ध्वनिप्रदूषणामुळे येथील पक्ष्याचे जीवन धोक्यात आले आहे. सायंकाळी नदीच्या किनाऱ्यावरील वृक्षावर विसावणाऱ्या पक्ष्यांच्या थव्यांचे दृश्य आता दुर्मीळ होऊ लागले आहे. नदीकाठावरील वृक्षवल्लीला घरघर लागलेली दिसत आहे.विकास तर झालाच पाहिजे, परंतु त्याचबरोबर संत तुकाराममहाराजांनी चारशे वर्षांपूर्वी ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ या अभंगातून वृक्ष आणि वनचरांचे महत्त्व सांगितले आहे, हे लक्षात घेऊन या पक्ष्यांचे जीवन वाचवावे व वृक्षांचे पुनर्रोपण किंवा नव्याने वृक्षारोपण करावे, अशी मागणी येथील निसर्गप्रेमींकडून होत आहे.
पक्ष्यांचे निवारे धोक्यात
By admin | Published: May 20, 2016 2:35 AM