अझहर शेख, नाशिकप्रकाशाचा उत्सव असलेल्या दीपावलीत फटाक्यांमुळे हवा व ध्वनिप्रदूषणाबरोबरच पक्ष्यांनाही अपाय होतो. यंदाही दिवाळीत आतषबाजीमुळे शेकडो पक्ष्यांना जीव गमवावा लागल्याचे पर्यावरणप्रेमींच्या निरीक्षणातून समोर आले आहे. सण-उत्सव साजरे करताना सजीवसृष्टीला अपायकारक ठरणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे आहे. त्यातूनच अनेक पर्यावरणप्रेमींनी मकर संक्रांतीच्या वेळी पतंगोत्सवासाठी नायलॉन बंदीसाठी विविध स्तरांवर केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. तरीही छुप्या पद्धतीने वापरण्यात येणाऱ्या मांज्यामुळे पक्षी जायबंदी होतात. आताही दिवाळीत फटाक्यांच्या धूमधडाक्यामुळे पक्ष्यांना अपाय होतात. दीपावलीचा उत्सव सुरू झाला की, फटाक्यांचे आवाज आणि त्याद्वारे होणारे वायुप्रदूषण पक्ष्यांच्या जीवावर बेतणारे ठरते. पक्ष्यांचा अधिवास असलेल्या झाडांच्या परिसरात अचानकपणे फटाके फुटू लागताच, पक्षी बिथरतात आणि घबराटीने काही मृत्युमुखी पडतात. काही आवाजापासून लांब जाण्यासाठी रात्रीच्या अंधाराची पर्वा न करता भरारी घेतात. मात्र, त्यांची ही भरारीदेखील जीवघेणी ठरते. अडथळ्यांवर आपटून पक्षी जमिनीवर कोसळतात. दरवर्षी दिवाळीच्या काळात मोठ्या संख्येने पक्षी बेघर होतात. क्षणभराचा फटाक्यांचा आनंद अनेक पक्ष्यांसाठी कर्दनकाळ ठरतो. नाशिकमध्ये अनेक संस्था व पक्षीप्रेमींनी सोशल मीडियाबरोबरच फटाक्यांच्या विरोधात व्यापक मोहीम सुरू केली आहे. वाढती मानवी वस्ती व शाश्वत विकास संकल्पना अंमलात न आणता केली जाणारी विकासकामे, यामुळे पक्ष्यांचा नैसर्गिक अधिवास शहर परिसरातून जवळपास संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. वड, पिंपळ, नांद्रुक, करंज, उंबर, कडुनिंब, चिंच यांसारखे पर्यावरणपूरक व जैवविविधता जोपासणारे आणि अन्न, निवारा या गरजा भागविणाऱ्या वृक्षांची संख्या दिवसेंदिवस घटत चालली आहे. त्यामुळे पक्ष्यांचे अस्तित्वही धोक्यात येत आहे. त्यातच सण-उत्सवांचे बदलते स्वरूप पक्ष्यांच्या मुळावर आले आहे.तीन दिवसांपूर्वीच जखमी अवस्थेतील कोकिळेला सोडविण्यात आले. धनत्रयोदशीपासून तुलसी विवाहापर्यंत जखमी पक्ष्यांच्या ‘रेस्क्यू’चे कॉल दिवाळीमध्ये दरवर्षी येतात. फटाक्यांमुळे पक्षी व पर्यावरणाची अपरिमित हानी होते.- शेखर गायकवाड, पक्षिमित्र
पक्षी ठरले दिवाळीच्या फटाक्यांचे बळी
By admin | Published: November 15, 2015 2:18 AM