निसर्गातील घडामोडींवरूनही मान्सूनचा ठोकताळा बांधला जातो. काही आदिम जमातींमध्ये आजही याच गोष्टी प्रमाणदेखील मानल्या जातात. त्यात महत्त्वाचे आणि सर्वाधिक चर्चेत असणारे कावळ्याचे घरटे! पावसाचे संकेत देणारे हे पक्षी आहेत तरी कोणते, याचा हा मागोवा.
पावसाळ्यापूर्वी पक्ष्यांची घरटी बांधण्याची लगबग सुरू झालेली असते. कावळा घरटे कुठे आणि कसे बांधतो आहे, यावरून यंदा पाऊसमान कसे असेल, याचा अंदाज बांधला जातो. कावळ्याने झाडाच्यामध्ये तीन फांद्यांच्या बेचक्यात घर बांधले असेल तर पाऊसकाळ चांगला समजला जातो, झाडाच्या शेंड्यावर घरटे बांधले असेल तर मध्यम पाऊसकाळ समजला जातो. वड, पिंपळ, आंबा इत्यादी महावृक्षांवर जर घरटे केले असेल, तर पाऊस चांगला पडणार आणि बाभूळ, सावर अशा काही काटेरी झाडांवर घरटं केलं तर पाऊस कमी पडतो, अशीही अटकळ बांधली जाते.
कावळीने घरट्यात अंडी किती घातली आहेत, यावरूनही जुन्या काळात पावसाचा अंदाज बांधला जात असे. तिने सुमारे चार अंडी दिली तर पाऊस चांगला पडतो. दोन अंडी दिली तर कमी पाऊस, एकच अंडे दिले तर अतिशय कमी आणि जमिनीवर अंडी दिली तर अभूतपूर्व दुष्काळाचे संकेत मानले जातात. अरण्यऋषी मारुती चितमपल्ली आणि इतर पक्षीतज्ज्ञांच्या लेखनामधून याचे संदर्भ आढळतात. चिमणी हा पक्षी एखाद्या फुफाट्यात बसून आपल्या अंगावर माती उडवून घेत असेल तर, ते चांगल्या पावसाळ्याचे संकेत मानले जातात.
तित्तीर पक्षी माळरानावर, शेतांवर काळ्या-पांढऱ्या, अंगावर ठिपके असलेल्या तित्तीर पक्ष्यांचे थवे ‘कोड्यान केको कोड्यान केको’ अशा सांकेतिक स्वरात ओरडू लागले की पाऊस येतोच असाही अनुभव आहे. मानवी वस्त्यांशेजारच्या माळरानावर तित्तीरांचा गडबडगुंडा सुरू झाला की ते हमखास पाऊस येतो, असे आदिवासी समाजाचे अभ्यासक सांगतात.
चातक पक्षी आफ्रिकेतून भारतभूमीत स्थलांतर करणारे चातक पक्षी सोबत पाऊस घेऊनच येतो. पाऊस अगदी वेळेवर येणार असेल, तर चातकाचे आगमन लवकर होते. त्यांचे आगमन लांबले तर पाऊसही लांबतो, असा पक्षितज्ज्ञांचा अनुभव आहे. ‘पिऊ.. पिऊ’ या त्यांच्या सांकेतिक आवाजात ओरडू लागले की हमखास समजावे मृगाची धार आता कोसळणार.
पावशा पक्षी पेर्ते व्हा, पेर्ते व्हा असे रानावनात ओरडून सांगणारा पावशा दिसू लागला की शेतकरी मशागतीच्या कामांना वेग देतो. कारण मान्सून येणार याचीच ती चाहूल मानली जाते.