मुंबई : दोन लहानग्या भावंडांना दोनदा वाऱ्यावर सोडणाऱ्या जन्मदात्या आईपासून दूर करत उच्च न्यायालयाने अखेरीस त्या बालकांना दत्तक घेण्याची परवानगी अमेरिकन दाम्पत्याला दिली. बालपणाचे सुख अनुभवण्याचा अधिकार असतानाही केवळ जन्मदात्या आईमुळे त्यांना या सुखापासून वंचित राहावे लागले, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने मुलांना दत्तक देण्याचा आदेश देताना नोंदवले.विकास आणि शीतल (बदललेली नावे) अनुक्रमे पाच व तीन वर्षांचे असताना त्यांच्या जन्मदात्या आईने त्याग केला. उल्हासनगरच्या सेंट्रल पोलीस ठाण्याने या दोघांनाही ठाण्याच्या बाल कल्याण समितीच्या ताब्यात दिले. त्यानंतर काही महिन्यांनी समितीने या मुलांना दत्तक भारतीय वंशाच्या कॅनेडियन दाम्पत्याला दत्तक देण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. सुनावणीवेळी त्यांच्या आईने आपल्या मुलांचा ताबा आपल्याकडेच द्यावा, यासाठी उच्च न्यायालयात मध्यस्थी याचिका दाखल केली. जन्मदात्या आईने मुलांना परत घेण्याची तयारी दाखवल्याने उच्च न्यायालयाने कॅनेडियन दाम्पत्याला मुलांना दत्तक देण्यास नकार दिला. मात्र मुलांच्या आईला मुलांचा सशर्त ताबा दिला. मुलांचा थेट ताबा आईला देऊ नका. आधी आई आणि मुलांमध्ये स्नेह वाढू द्या आणि आईच्या वृत्तीत बदल होऊ द्या. मगच मुलांना तिच्याबरोबर पाठवा, असा आदेश उच्च न्यायालयाने समितीला दिला.डीएनए चाचणीवरून मुलांवर दावा सांगणारी महिला त्यांचीच जन्मदात्री आई असल्याचे सिद्ध झाले. मुलांना भेटण्याचे आणि त्यांच्याशी जिव्हाळा निर्माण करण्याची संधी उच्च न्यायालयाने देऊनही मुलांच्या आईने त्यांना न भेटणेच पसंत केले. त्यामुळे समितीने पुन्हा एकदा त्या मुलांना अमेरिकन दाम्पत्याला दत्तक देण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली. या याचिकेवरील सुनावणी न्या. गौतम पटेल यांच्या खंडपीठासमोर होती. बाल कल्याण समितीच्या वकिलांनी मुलगा आईचा राग करत असल्याचे मानसोपचार तज्ज्ञांचे म्हणणे असल्याची माहिती न्या. पटेल यांना दिली. ‘मुलगा साहजिकच आईचा राग करणार. आईने त्यांना एकदा सोडले. पुन्हा दुसऱ्यांदा त्यांना जवळ घेण्याची आशा तिने त्या मुलांमध्ये निर्माण केली आणि त्यालाही तडा दिला,’ असेही उच्च न्यायालयाने म्हटले. तीन आणि पाच वर्षांच्या मुलांचा त्याग करणे, हे आईसाठी सोपे नसते. तशी परिस्थिती कदाचित तिच्यापुढे निर्माण झाली असेल. पण दुसऱ्यांदा न्यायालयाने संधी देऊनही तिने पुन्हा मुलांचा त्याग केला. त्यामुळे अशा परिस्थितीत मुलांना दत्तक देणे योग्य आहे, असे म्हणत न्यायालयाने दोन्ही मुलांना अमेरिकेच्या दाम्पत्याला दत्तक देण्याची परवानगी दिली. (प्रतिनिधी)मुलांच्या मानसिक अवस्थेची काळजी ‘बालपणीचा सुखाचा काळ अनुभवण्याचा अधिकार असणाऱ्या मुलांचे भवितव्य जन्मदात्या आईमुळे फुटबॉलप्रमाणे झाले. आईकडून एका एजन्सीकडे मग अन्य एजन्सीकडे त्यांची फरफट झाली. त्यांचा आईसाठी असलेला स्नेह आईच्या वर्तनामुळे तुटला. मोठ्या नामुश्कीने दत्तक घेणाऱ्या (कॅनेडियन दाम्पत्य) आई-वडिलांशी स्नेह निर्माण केला. मात्र पुन्हा एकदा त्यांच्या आईमुळे तो बंध तुटला. यादरम्यान ही चिमुरडी मुले कोणत्या मानसिक अवस्थेतून गेली असतील, याची कल्पना करणे कठीण आहे. ही स्थिती अत्यंत हृदयद्रावक आहे,’ असे न्या. पटेल यांनी म्हटले.
जन्मदात्रीने दोनदा त्यागलेल्या मुलांचा ताबा परदेशी दाम्पत्याकडे
By admin | Published: May 02, 2016 12:54 AM