डहाणू : दोन दिवसांपूर्वी शहरातून अपहरण झालेल्या व अवघ्या आठ तासांत पाच अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटका झालेल्या दिया सचिन नहार या बारा वर्षीय मुलीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून आपल्या सुटकेकरिता त्यांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल त्यांचे आभार मानले. ‘दी सायलेंट हीरो’ या शब्दांत दियाने फडणवीस यांचे कौतुक केले असून, दियाचे हे कृतज्ञतापूर्वक उद्गार ही मुख्यमंत्र्यांकरिता वाढदिवसाची अनोखी भेट ठरली आहे.२० जुलै रोजी डहाणू, मसोली येथील घरातून दियाचे पहाटे अपहरण झाले. डहाणूत या घटनेने एकच खळबळ उडाली होती. दियाने मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या खुल्या पत्रात नमूद केले की, केवळ आठ तासांत अपहरणकर्त्यांकडून माझी सुटका केल्याबद्दल मी व माझे कुटुंबीय मुख्यमंत्र्यांचे ऋणी आहोत. माझ्या सुटकेकरिता अपहरणकर्त्यांनी पाच कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. माझे वडील सचिन यांनी आमच्या कुटुंबाचे मित्र महावीर जैन यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या कानांवर घडला प्रकार घातला. त्यांनी लागलीच मुख्यमंत्री फडणवीस यांचे खासगी सचिव अभिमन्यू पवार यांच्याशी संपर्कसाधला असता मुख्यमंत्र्यांनी या घटनेची तत्काळ दखल घेऊन कोकण परिक्षेत्र महानिरीक्षक प्रशांत बुरुडे यांना शोधकार्याचे आदेश दिले. ७ पथकांची निर्मिती करून लागलीच शोधकार्य सुरू झाले. तसेच पालघर जिल्हा पोलीस अधिक्षिका शारदा राऊत यांनीही शोधमोहीम हाती घेतली होती. ही या परिसरातील पहिलीच घटना असेल. (वार्ताहर) सर्व अपहरणकर्ते गजाआड झाल्याने आता मी निश्चिंत असून सुटकेचा नि:श्वास टाकू शकते. एखाद्या नायकाला आपण जशी मानवंदना देतो तशीच मानवंदना मी मुख्यमंत्र्यांना देते आणि त्यांना वाढदिवसाच्या मन:पूर्वक लाखलाख शुभेच्छा देते, असे दियाने पत्रात म्हटले.
दियाची मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाची भेट
By admin | Published: July 23, 2016 4:14 AM