वाकी येथील घटना : चार तरुण वाहून गेलेनागपूर : वाकी येथे जन्मदिवसाची पार्टी साजरी करण्यासाठी गेलेल्या नागपुरातील आठ तरुणांपैकी चार तरुण कन्हान नदीत वाहून गेले. रात्री उशिरापर्यंत त्यांचा शोध लागू शकला नाही. गीत कुमार पुरणलाल टेंभरे (२०) रा. खरबी रोड नागपूर, विनय खोब्रागडे (२२) रा. बहादुरा रोड , धीरज सत्यवान पिल्लेवान (२०) नंदनवन के.डी.के. कॉलेज आणि ईश्वर वांढरे (२१) वाठोडा ले-आऊट असे वाहून गेलेल्या तरुणांची नावे आहे. दुपारी ३.३० वाजता ही घटना घडली असल्याने त्यांच्या वाचण्याची शक्यता कमीच असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. ईश्वर याचा आज वाढदिवस होता. त्यामुळे वाकी दरगाह येथे वाढदिवसाची पार्टी साजरी करण्यासाठी ईश्वरसह त्याचे आठ मित्र तीन मोटारसायकलवर बसून दुपारी १ वाजता वाकी दरगाह येथे पोहोचले. सर्वप्रथम सर्व मित्रांनी वाकी दरगाह येथे जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर पार्टी साजरी करण्यासाठी कन्हान नदीच्या किनाऱ्यावर पोहोचले. मागील काही दिवसांपासून संततधार पाऊस असल्याने नदी चांगलीच भरून वाहत होती. सर्व तरुण नदीत उतरण्याची तयारी करीत होते. परिसरातील लोकांनी त्यांना रोखण्याचा बराच प्रयत्न केला. परंतु कुणीही ऐकायला तयार नव्हते. आठही मित्र नदीत उतरले. गीत हा कमरेपर्यंत आत गेल्यावर तो पाण्यात बुडू लागला. त्याने आरडाओरड केली. त्याला बुडताना पाहून विनय, धीरज व ईश्वर त्याला वाचवण्यासाठी पुढे आले परंतु ते सुद्धा पाण्यात वाहून गेले. परिसरातील नागरिकांनी याबाबत लगेच पोलिसांना सूचना दिली. खाप्याचे पोलीस निरीक्षक विजयकुमार तिवारी आपल्या चमूसह घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी मासेमारी करणाऱ्या स्थानिक नागरिकांच्या मदतीने चारही तरुणांचा शोध सुरू केला. दरम्यान उर्वरित चार तरुणांनी घटनेची माहिती कुटुंबीयांना दिली. वाहून गेलेल्या तरुणांचे कुटुंबीय सुद्धा घटनास्थळी पोहोचले. रात्री उशिरापर्यंत शोधकार्य सुरू होते. (प्रतिनिधी)
बर्थ डे पार्टी जीवावर बेतली!
By admin | Published: September 15, 2014 12:57 AM