मुंबई : सणांपासून निवडणुकीपर्यंत सततच्या बंदोबस्तात गढून गेलेले पोलीस यापुढे स्वत:चा आणि लग्नाचा वाढदिवस हक्काची सुट्टी घेऊन कुटुंबासोबत साजरा करू शकतील. गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी तशी घोषणा केली.पोलीस पुत्रांना भरतीत पाच टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतल्याने रयतराज कामगार संघटनेने पाटील यांचा सत्कार केला. या कार्यक्रमात वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते. पोलिसांचा ताण कमी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. गेल्या पाच वर्षांत ५५ हजार पोलिसांची भरती करण्यात आली. नव्याने ६४ हजार पदे भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. भरती प्रक्रियेत महिलांसाठी वजन-उंचीची अट शिथील केल्याने देशात महिला पोलिसांचे सर्वाधिक प्रमाण महाराष्ट्रात आहे.पोलीस वसाहतींचा प्रश्न गंभीर आहे. या वसाहतींच्या दुरूस्तीसाठी दरवर्षी १०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले. याशिवाय निवृत्त पोलिसांसाठी नवी मुंबईत सोसायटी निर्माण करण्यात येणार असून, त्यात किमान ८ हजार घरे उपलब्ध होणार आहेत, असा दावाही त्यांनी यावेळी केला. (प्रतिनिधी)
वाढदिवशी पोलिसांना हक्काची सुट्टी
By admin | Published: August 29, 2014 3:35 AM