नाशिक : जिल्हा न्यायालयात एका मनोरुग्ण युवकाने पोलीस कर्मचाऱ्यास चावा घेऊन गंभीर दुखापत केल्याची घटना सोमवारी (दि़२७) सायंकाळच्या सुमारास घडली़ चावा घेण्याची सवय जडलेल्या या मनोरुग्णास जिल्हा न्यायालयातील मुख्य न्यायदंडाधिकारी एस़ एम़ बुक्के यांनी ठाणे येथील मनोरुग्ण रुग्णालयात दाखल करण्याचे आदेश दिले आहेत़शरणपूररोडवरील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मुख्यालय आवारातील एका मनोरुग्ण अर्धनग्न युवकास सरकारवाडा पोलिसांनी कपडे देऊन पंचवटीतील एका आधाराश्रमात दाखल केले होते़ या ठिकाणी काही दिवस राहिल्यानंतर इतर विद्यार्थ्यांना चावा घेऊन त्रास देण्यास सुरुवात केली़ या युवकास अटकाव करणे अशक्य असल्याची माहिती आश्रमाच्या संचालकांनी सरकारवाडा पोलिसांना दिली़ पोलिसांनी या मनोरुग्ण युवकाचा ताबा घेऊन त्यास उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले़ मात्र, या ठिकाणीही या युवकाचा त्रास सुरूच असल्याने पोलिसांनी या युवकास सोमवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास जिल्हा न्यायालयात दाखल केले़ यावेळी पोलिसांनी या युवकास ठाणे येथील रुग्णालयात दाखल करण्याची विनंती केली़ न्यायालयात बराच वेळेपासून उभ्या असलेल्या या युवकाजवळून एक पोलीस कर्मचारी जात असताना त्याने पोलिसाच्या खाद्यास कडकडून चावा घेतला़ यामध्ये पोलीस कर्मचारी जखमी झाला, तर या युवकास शांत करण्यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त मागवावा लागला होता़ (प्रतिनिधी)
मनोरुग्णाने घेतला पोलीस कर्मचाऱ्यास चावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2017 11:20 PM