काँग्रेसचा प्रस्ताव भाजपानं स्वीकारला; राज्यसभा निवडणूक बिनविरोध होणार, उमेदवारी मागे घेतली
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2021 01:41 PM2021-09-27T13:41:49+5:302021-09-27T13:42:44+5:30
राज्यसभा पोटनिवडणुकीत बिनविरोध निवड झालेल्या काँग्रेस नेत्या रजनी पाटील यांचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अभिनंदन केले.
मुंबई - राज्यसभा पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी काँग्रेस पक्षाने केलेल्या आवाहनाचा विचार करून भारतीय जनता पार्टीने आपल्या उमेदवाराचा अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी दिली. त्यामुळे ४ ऑक्टोबरला होणारी राज्यसभा निवडणूक बिनविरोध होणार असून काँग्रेसच्या रजनी पाटील यांची खासदारपदी निवड होण्याची अधिकृत घोषणा बाकी आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले(Nana Patole)आणि काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात(Congress Balasaheb Thorat) यांनी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(BJP Devendra Fadnavis) यांची भेट घेऊन पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी भाजपाच्या उमेदवाराने माघार घ्यावी, असं आवाहन केले होते. काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक होत असून एखाद्या नेत्याच्या निधनामुळे होणारी पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची परंपरा आहे, याचा उल्लेख काँग्रेस नेत्यांनी चर्चेत केला. काँग्रेस नेत्यांच्या आवाहनाचा विचार करून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पक्षाच्या कोअर कमिटीच्या सदस्यांशी विचारविनिमय केला आणि भाजपाने उमेदवारी अर्ज मागे घ्यावा असा निर्णय घेतला. त्यानुसार मुंबई भाजपा सरचिटणीस संजय उपाध्याय यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. राज्यसभा पोटनिवडणुकीत बिनविरोध निवड झालेल्या काँग्रेस नेत्या रजनी पाटील यांचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अभिनंदन केले.
पटोले-थोरात यांनी घेतली होती फडणवीसांची भेट
काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाजपाचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. राज्यसभेची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी या चर्चेसाठी काँग्रेसच्या नेत्यांनी ही भेट घेतली होती. परंतु या भेटीमुळे महाविकास आघाडीतील इतर दोन पक्ष नाराज झाल्याची माहिती समोर आली होती. महाविकास आघाडीच्या एकीवर काँग्रेसला विश्वास नाही का? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. काँग्रेस नेत्यांनी फडणवीस यांची भेट घेतल्यानं शिवसेना-राष्ट्रवादीला हे रुचलं नव्हतं.
राज्यसभेची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी असं काँग्रेसला वाटतं म्हणून त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. परंतु फडणवीसांनी काँग्रेससमोर आणखी एक प्रस्ताव ठेवला तो म्हणजे मागील अधिवेशनात भाजपाचे १२ आमदार निलंबित करण्यात आले आहेत. या आमदारांचे निलंबन रद्द करावं असा प्रस्ताव फडणवीसांनी काँग्रेसला दिला होता. परंतु हा निर्णय महाविकास आघाडीचा आहे. काँग्रेस एकटी यावर निर्णय घेऊ शकणार नाही. परंतु फडणवीसांनी हा प्रस्ताव देऊन काँग्रेसची गोची केली होती. आता भाजपानं काँग्रेसचा प्रस्ताव स्वीकारल्यानं भाजपाच्या १२ आमदारांचे निलंबन रद्द होणार का? हे पाहणं गरजेचे आहे.