Maharashtra Politics: महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजले. या अधिवेशनात अनेकविध मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले. विधिमंडळाच्या पायऱ्यांवरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सत्ताधाऱ्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेल्या एका विधानावरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. यावरून भाजप नेतेही आक्रमक झाले असून, अजित पवार यांनी माफी मागावी आणि तत्काळी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे.
आपण महाराष्ट्रामध्ये राहत असून इथे अंधश्रद्धेला खतपाणी घातलं जात नाही. तसेच 'बाल शौर्य पुरस्कार' हा किमान स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीदिनी देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी करावी, अशी मागणीही त्यांनी केली. छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक होते, धर्मवीर नव्हते. त्यांनी धर्माचा कधीच पुरस्कार केला नाही, असे अजित पवार यांनी स्पष्ट शब्दात सांगितले. संभाजी महाराजांचा उल्लेख हा स्वराज्यरक्षक असाच करावा, असेही अजित पवार यांनी म्हटले आहे. यावरून आता शिंदे गट आणि भाजप आक्रमक झाले असून, अजित पवारांवर टीका करण्यात येत आहे.
अजित पवारांना पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही
भाजप आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी अजित पवारांवर टीका केली आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे हिंदू समाजाचे स्वाभिमान, अस्मिता आहेत. अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान केल्यामुळे या पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही. असे बोलण्याचा अधिकार अजित पवार यांना कुणी दिला? अजित पवार यांनी तातडीने माफी मागावी आणि राजीनामा द्यावा, असे तुषार भोसले यांनी म्हटले आहे.
दरम्यान, शिंदे गटाचे नेते आणि सरकारमधील मंत्री शंभुराज देसाई यांनीही अजित पवारांच्या या विधानाचा समाचार घेतला असून, अजित पवारांचे वक्तव्य लोकां सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वत: कोरडे पाषाण अशापद्धतीचे आहे. याची निंदा करावी तेवढी थोडी आहे. दादांनी छत्रपती संभाजी महाराजांचा धर्मवीर म्हणून नका असे सांगणे निषेधार्ह आहे. महाराष्ट्रामध्ये या वक्तव्यावरून मोठ्या प्रमाणावर उद्रेक होईल. आपण बोललो हे चुकीचे आहे हे अजित पवारांच्या लक्षात येईल. छत्रपती संभाजी महाराज हे कालही धर्मवीर, धर्मरक्षक होते आजही आहेत आणि इतिहासाच्या अखेरीपर्यंत ते धर्मवीर धर्मरक्षकच राहतील, असे शंभुराज देसाई यांनी सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"