ऑनलाइन लोकमत
हिंगोली, दि. 6 - कळमनुरी मतदारसंघाचे दोनदा आमदार राहिलेले गजानन घुगे यांनी भाजपात प्रवेश केला आहेय मागील काही दिवसांपासून शिवसेनेत घुसमट होत असल्याने ते भाजपात प्रवेश करणार असल्याचे निश्चित होते. अखेर आज रात्री दहा वाजता मुंबईत झाला आहे. तर दुसरीकडे माजी खा. सुभाष वानखेडे हे आता घरवापसी करीत भाजपमधून पुन्हा शिवसेनेत येणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
हिंगोली जिल्ह्यात मागील काही काळात भाजपमध्ये प्रवेश करणाºयांची संख्या वाढू लागली होती. काँग्रेस, राष्ट्रवादीतून जाणाºयांची संख्या जास्त होती. मात्र आता शिवसेनेच्या माजी आ. गजानन घुगे यांना पक्षप्रवेश देत भाजपने आणखी एका दिग्गजाला पक्षात ओढले आहे. मागच्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर घुगे यांचे पक्षातील काहींशी बिनसले होते. त्यातच जिल्हाप्रमुख संतोष बांगर व त्यांच्यात विस्तवही आडवा जात नव्हता. त्यांचे उभे दोन गट पडले होते. पक्षाने बांगर यांना साथ दिल्याने घुगे अस्वस्थ होते. त्यातच मागच्या जि.प.निवडणुकीत त्यांचा शब्द पक्षाने न राखल्याने ते नाराज होते. त्याची किंमतही पक्षाला मोजावी लागली. मात्र त्यानंतर त्यांनी मतदारसंघात कार्यकर्ते, जि.प., पं.स. सदस्य, नगरसेवकांत चाचपणी करून भाजपप्रवेशाची तयारी चालविली होती. त्यात काहीजण त्यांच्यासोबत मनाने आहेत. मात्र तांत्रिकदृष्ट्या त्यांना सोबत देणे शक्य नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दौरा वारंवार रद्द होत असल्याने त्यांना हिंगोलीत त्यांच्या हस्ते प्रवेश घेणे शक्य झाले नाही. शेवटी ६ जून रोजी त्यांनी मुंबईत भाजपप्रवेश घेतला. आ.तान्हाजी मुटकुळे यांनी त्यासाठीची पूर्ण तयारी आधीच करून ठेवली होती. मात्र या प्रकाराची मंगळवारी दिवसभर एकच चर्चा होती. शेवटी रात्री सव्वा दहाच्या सुमारास त्यांची प्रवेशाची प्रक्रिया पार पडली अन् चर्चेला पूर्णविराम मिळाला.
आगामी विधानसभेच्या अनुषंगाने त्यांचा प्रवेश झाल्याचे मानले जात आहे. आधीच या तालुक्यातील माजी खा. शिवाजी माने हेही पक्षात असल्याने ही गणिते आताच मांडणे धाडसाचे ठरणार आहे. मात्र भाजप आगामी विधानसभेची गणिते मांडताना दिसत आहे.