नवी दिल्ली : वाराणशीत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या रोड शोच्या निमित्ताने भाजपाने पुन्हा एकदा निवडणूक आयोगावर हल्लाबोल केला आहे. वाराणशीत ज्या भागात सुरक्षा कारणास्तव नरेंद्र मोदी यांच्या सभेला परवानगी नाकारण्यात आली., त्याच भागात राहुल यांचा रोड शो कसा? असा संतप्त सवाल भाजप नेते अरुण जेटली यांनी केला. यामागे राजकीय कारण असल्याचा आरोप करीत, भाजपाच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवाराच्या सभेला परवानगी नाकारली, हा निवडणूक आयोगावरील ‘डाग’ कायम राहील, असेही ते म्हणाले. राहुल गांधींनी ५0 रोड शो करावे. पण आम्हाला परवानगी नाकारणे आणि त्यांना देणे, हे गैर आहे, असे भाजप प्रवक्त्या मीनाक्षी लेखी म्हणाल्या. भाजप नेते मुख्तार अब्बास नकवी यांनीही ट्विट करून यासंदर्भात संतप्त प्रतिक्रिया नोंदविली. मोदींना परवानगी नाकारणे आणि राहुल यांना देणे, हा वाराणशीतील आणखी एक पक्षपाती निर्णय असल्याचे ट्विट त्यांनी केले.
भाजपाचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
By admin | Published: May 11, 2014 12:40 AM