पुणे - मागच्या ३ आठवड्यात माझी देवेंद्र फडणवीसांची चर्चा झाली होती. मी याबाबत निर्णय घेतो असं त्यांनी सांगितलंय. आम्ही कायमच लोकांमध्ये असतो, ग्राऊंडला काम करत असतो त्यामुळे तयारी वैगेरे विषय माझ्यासाठी गौण आहे. आमच्या पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस काय निर्णय घेतात ते पाहू. कारण त्यांनीच याबाबत इंदापूरला जाहीर सभेत बोलले होते. सागर बंगल्यावर जी बैठक झाली, त्यात निवडक ३००-४०० कार्यकर्त्यांसोबतही आमची चर्चा झाली होती. तेव्हाही फडणवीसांनी सांगितले होते त्यामुळे ते योग्य निर्णय घेतील असा विश्वास भाजपा नेते हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केला. पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे शरद पवार आणि हर्षवर्धन पाटील यांची भेट झाली. या भेटीनंतर पाटलांनी माध्यमांशी संवाद साधला.
हर्षवर्धन पाटील म्हणाले की, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या गर्व्हनिंग कौन्सिलची बैठक दर ३ महिन्यांनी होते, आज ती बैठक झाली. आम्ही जेवढे सदस्य आहोत त्यांच्यात अडीच तीन तास बैठक झाली. शेतकऱ्यांसाठी काम करणारी ही मोठी संस्था आहे. या बैठकीत वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट संबंधित विषयावर चर्चा झाली. संस्थेचे अध्यक्ष शरद पवार आहेत. बरेच विषय होते, मधल्या काळात निवडणूक असल्याने अनेक विषय प्रलंबित होते. मराठवाड्यात जालना येथे जमीन घेऊन तिथे इन्सिट्यूटकडून संशोधनाचं काम सुरू आहे. विदर्भात नागपूरला जमीन घेतली आहे तिथे शेतकऱ्यांसाठी काम सुरू आहे. विशेषत: खान्देशातही गुजरातच्या सीमेवर नंदूरबार, धुळे परिसरात तिथेही नवीन जागा बघण्याचं काम सुरू आहे. या सर्व माध्यमातून महाराष्ट्रातला आणि देशातला ऊस उत्पादक शेतकरी यांच्यासाठी नवीन तंत्रज्ञान विकसित करण्याचं काम ही संस्था करते. शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली संस्थेचे कामकाज होते. या प्रकारचे विषय आजच्या बैठकीत झालेत. या बैठकीत कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही असं त्यांनी सांगितले.
तसेच माझ्याशी राजकीय कुणी काही बोललं नाही. आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे काय बोलले हे माहिती नाही. माझ्याकडून अशी कुठलीही भूमिका इतर पक्षांत जाण्याची झालेली नाही. माझ्याशी कुणी संपर्क साधला नाही. सध्या अजित पवारांचे जे दौरे सुरू आहेत त्यात तालुक्याचा जो विद्यमान आमदार असेल त्यांना ती जागा मिळणार असं बोललं जातंय. त्यामुळे साहजिकच आमच्या मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा खूप आग्रह आहे. लोकशाहीत प्रत्येकाला मत व्यक्त करण्याचा अधिकार असतो. लोकसभा निवडणुकीवेळी अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि माझी अशी चर्चा झाली होती. त्यात अजितदादा म्हणाले होते की, देवेंद्र फडणवीस इंदापूरबाबतीत जो निर्णय घेतील तो मी मान्य करेन. त्यांनी भाषणातही असा उल्लेख केला होता. मलाही देवेंद्र फडणवीस मी इंदापूरबाबतीत निर्णय घेईन असं म्हटले आहेत. त्यामुळे मी वाट बघतोय की फडणवीस काय निर्णय घेतायेत असं हर्षवर्धन पाटील यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, लोकशाहीत बॅनरबाजी होत राहते. कोण बॅनर लावतं माहिती नाही. प्रत्येकाचा अधिकार असतो. जनता महत्त्वाची आहे. जनतेचा जो आग्रह असतो, रेटा असतो, हा आग्रह आमच्या पक्षातील नेतृत्वापर्यंत पोहचला आहे. वरिष्ठ पातळीवर काय निर्णय होतो हे बघू. महायुतीच्या जागावाटपात कुठलाही अंतिम निर्णय झालेला नाही. वरिष्ठ पातळीवरील चर्चेत मी नाही पण कोअर कमिटीतही याबाबत चर्चा झाली नाही. लोकसभेला आम्ही अजित पवारांचे काम केले. महायुतीत जी चर्चा झाली त्याप्रमाणे निर्णय घ्यावा असा माझा आग्रह आहे. महायुतीच्या जागावाटपाचा निर्णय एक पक्ष घेणार नाही, तो तिन्ही पक्ष घेणार आहेत. इंदापूरात तुम्ही निवडणूक लढवाच, अपक्ष उभे राहा हा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. तो जनतेचा आवाज आमच्या नेत्यांपर्यंत गेलेला आहे. त्यामुळे आमच्या पक्षातील वरिष्ठांनी योग्य तो निर्णय घ्यावा एवढेच आमचे मत आहे असं हर्षवर्धन पाटील यांनी म्हटलं.