"आमचं गाव विकणे आहे"; पवारांच्या काटेवाडीत भाजपा नेत्यांनी का दिली अशी घोषणा?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2023 06:16 PM2023-11-05T18:16:07+5:302023-11-05T18:16:35+5:30

जनतेचे प्रश्न लोकांसमोर आणण्यासाठी आम्ही निवडणूक लढवतोय. जनशक्तीविरोधात धनशक्ती अशी निवडणूक आहे असं भाजपा पॅनेल प्रमुख पांडुरंग कचरे यांनी सांगितले. 

BJP alleges that Ajit Pawar group distributed money in Katewadi Gram Panchayat elections | "आमचं गाव विकणे आहे"; पवारांच्या काटेवाडीत भाजपा नेत्यांनी का दिली अशी घोषणा?

"आमचं गाव विकणे आहे"; पवारांच्या काटेवाडीत भाजपा नेत्यांनी का दिली अशी घोषणा?

पुणे – राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा उडत आहे. त्यातच सत्तेत भागीदारी असलेल्या मित्रपक्षांमध्येच जुंपल्याचे पाहायला मिळते. बारामतीतील काटेवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत अजित पवार गटाने पैसे वाटल्याचा आरोप भाजपाने केला आहे. तर भाजपाचा हा आरोप अजित पवार गटाने फेटाळून लावला आहे. राज्याच्या सत्तेत एकत्र असलेल्या मित्रपक्षांमधील या आरोप-प्रत्यारोपामुळे गावात चांगलीच चर्चा सुरू झाली आहे. 

भाजपा पॅनेलकडून असलेले पांडुरंग कचरे म्हणाले की, २५० रुपये एका मताला आमचा गाव विकायला निघाला आहे. आमचा गाव विकणे आहे, एका माणसाची किंमत २५० रुपये आहे अशा आशयाचे बोर्ड आम्ही गावात लावणार आहे. ही खेदाची गोष्ट आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या गावात जर तुम्ही विकास केला असेल तर ५६०० मतदारांच्या गावात ४५०० लोकांना पैसे वाटण्याची गरज का पडली? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. 

तसेच ही निवडणूक काटेवाडीतील ग्रामस्थांचा स्वाभिमान जिवंत ठेवण्यासाठी आहे. गावात रस्त्याची सोय ना गटाराची, विकासाची गंगा वाहिली असेल तर अडीचशे रुपये मताला गाव विकायला काढला. अत्यंत अनागोंदी कारभार सुरू आहे. गावात क्रिंडागण नाही, उद्यान नाही, शौचालय नाही. गावात अनेक प्रश्न आहे. झोपडपट्टीच्या शेजारी कचराकुंडी केली. जनतेचे प्रश्न लोकांसमोर आणण्यासाठी आम्ही निवडणूक लढवतोय. जनशक्तीविरोधात धनशक्ती अशी निवडणूक आहे असं भाजपा पॅनेल प्रमुख पांडुरंग कचरे यांनी सांगितले. 

दरम्यान, गल्ली ते कोपऱ्यापर्यंत आम्ही विकास केलाय. शौचालयाचा मुद्दा विरोधकांनी घेतला. परंतु संपूर्ण गाव हगणदारीमुक्त आहे. घरोघरी शौचालय आहे. त्यामुळे सार्वजनिक शौचालय बांधले नाही. कुणी काही आरोप करायचे याला बंधन घातले नाही. त्यांच्याकडे पुरावे काय, मीदेखील म्हणतो त्यांनी पैसे वाटलेत असा आमचाही आरोप आहे. मागील पंचवार्षिकमध्ये आम्ही त्यांचा दारूण पराभव केला होता. अजितदादांच्या माध्यमातून कोट्यवधीचा निकाल गावात आलाय, विकासकामे झालीत. आमच्या सगळ्या जागा निवडून येणार असं सांगत अजित पवार गटाचे नेते माजी सरपंच विद्याधर काटे यांनी आरोप फेटाळून लावले आहेत. 
 

Web Title: BJP alleges that Ajit Pawar group distributed money in Katewadi Gram Panchayat elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.