अमित शाह यांची पवारांवर टीका; नंतर धनंजय मुंडेंनी दिलेल्या प्रतिक्रियेने सर्वांच्याच भुवया उंचावल्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2024 01:26 PM2024-07-22T13:26:28+5:302024-07-22T13:28:45+5:30

अमित शाह यांच्या शरद पवारांवरील टीकेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतून काय प्रतिक्रिया उमटणार, याबाबत उत्सुकता होती.

bjp Amit Shah criticizes sharad Pawar Then ajit pawar ncp leader Dhananjay Munde reaction gone viral | अमित शाह यांची पवारांवर टीका; नंतर धनंजय मुंडेंनी दिलेल्या प्रतिक्रियेने सर्वांच्याच भुवया उंचावल्या!

अमित शाह यांची पवारांवर टीका; नंतर धनंजय मुंडेंनी दिलेल्या प्रतिक्रियेने सर्वांच्याच भुवया उंचावल्या!

Dhananjay Munde ( Marathi News ) : भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत काल पुणे इथे भाजपचा राज्यस्तरीय मेळावा पार पडला. विधानसभा निवडणूक तयारीचा आढावा घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्यातून अमित शाह यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. पवार हे भ्रष्टाचाराचे सरदार असल्याचं ते म्हणाले. अमित शाह यांच्या या टीकेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतून काय प्रतिक्रिया उमटणार, याबाबत उत्सुकता असताना राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेल्या प्रतिक्रियेनं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. "तथ्य असल्याशिवाय अमित शाह असं बोलणार नाहीत," असं मुंडे यांनी म्हटलं.

अमित शाह यांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर धनंजय मुंडे म्हणाले की, "शाह यांनी एकदा एखादं वक्तव्य केल्यानंतर मी त्यावर बोलणं योग्य नाही. मात्र तथ्य असल्याशिवाय ते असं बोलणार नाहीत," अशा शब्दांत धनंजय मुंडे यांनी अप्रत्यक्षरीत्या पवारांवर निशाणा साधला. मुंडे यांच्या या वक्तव्याची चर्चा होऊ लागल्यानंतर त्यांना पुन्हा याबाबत विचारणा करण्यात आली. त्यावर ते म्हणाले की, "मी जे काही बोलले ते माझं वैयक्तिक मत आहे. तुम्हाला या वक्तव्याचा किस पाडायचा असेल तर पाडा, माझी त्याला तयारी आहे."

दरम्यान, काका शरद पवार यांच्यावर झालेल्या टीकेनंतर अजित पवार यांनी मात्र प्रतिक्रिया देणं टाळलं आहे. नो कॉमेंट्स, असं म्हणत अजित पवार यांनी सध्या याबाबत आपली भूमिका स्पष्ट करण्यास नकार दिला आहे. 

अमित शाह यांनी नेमकी काय टीका केली होती?

"भ्रष्टाचाराचे सर्वांत मोठे म्होरके शरद पवार असून, त्यांचा खोटेपणा आता चालणार नाही. शरद पवारांचे केंद्रात, राज्यात दहा वर्षे सरकार होते, तेव्हा त्यांनी काय केले," असा सवाल उपस्थित करतानाच कसाबला बिर्याणी खाऊ घालणाऱ्यांना उद्धव ठाकरे साथ देत आहेत. महाविकास आघाडी म्हणजे 'औरंगजेब फॅन क्लब' असून उद्धव ठाकरे हे त्या क्लबचे नेते असल्याची घणाघाती टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी पुण्यातील मेळाव्यात केली.

अमित शाह म्हणाले, "आम्ही कामे केली. त्याचा हिशेब आमच्याकडे आहे. शरद पवारांचे केंद्रात, राज्यात दहा वर्षे सरकार होते, तेव्हा काय केले? केंद्रातील भाजप सरकारने दहा वर्षांत १० हजार ५ कोटी रुपये महाराष्ट्राला दिले आहेत. रस्त्यांसाठी ७५ हजार कोटी, रेल्वे मार्गासाठी २ लाख कोटी दिले. ३१ लाख कोटी मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी दिले. पालखी मार्गासाठी ११ हजार कोटी दिले. ही सर्व कामे आम्ही केली. पवारांनी कसला विकास केला? पवार यांनी त्यांची कामे दाखवावी. मी पुण्यात आलोय. शरद पवार यांना विचारतो, की त्यांनी दहा वर्षे कृषिमंत्री असताना काय केले? त्यांनी मराठा आरक्षण का नाही दिले? राहुलबाबा हे खटाखट पैसे देणार होते, त्याचे काय झाले? भाजप आरक्षणाला पाठिंबा देत आहे. पवार अडचणी निर्माण करताहेत," असा आरोप शाह यांनी काल केला आहे.
 

Web Title: bjp Amit Shah criticizes sharad Pawar Then ajit pawar ncp leader Dhananjay Munde reaction gone viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.