Maharashtra Politics: एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत ऐतिहासिक बंडखोरी करत भाजपसोबत सत्ता स्थापन केली. महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. त्यावर सुनावणी सुरू आहे. यानंतर ठाकरे गट आणि शिंदे गटातील संघर्ष तीव्र होत गेला. अलीकडेच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये भाजप आणि शिंदे गट यांना अनेक ठिकाणी यश मिळाले. मात्र, शिंदे-फडणवीस सरकारला सहा महिने होत असतानाच भाजप आणि शिंदे गटात अंतर्गत धुसपूस सुरू झाल्याचे सांगितले जात आहे.
विधान परिषदेच्या पाच जागांसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीवरुन बाळासाहेबांची शिवसेना म्हणजेच शिंदे गट आणि भाजपमध्ये धुसफुस सुरु झाली आहे. यासंदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीत विषय उपस्थित करण्यात आला. भाजपने परस्पर उमेदवार जाहीर केल्याबद्दल शिंदे गटाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. तसेच देवेन भारती यांच्या नियुक्तीवरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याचे बोलले जात आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी निवडणुकीसाठी तीन उमेदवारांची नावे जाहीर केली
राज्यातील विधान परिषदेच्या पाच जागांसाठी ३० जानेवारी रोजी निवडणूक होणार आहे. विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर अशा पाच जागांसाठी निवडणूक होत आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या निवडणुकीसाठी तीन उमेदवारांची नावे जाहीर केली. कोकण विधान परिषदेकरीता ज्ञानेश्वर म्हात्रे, पश्चिम विदर्भातून रणजीत पाटील आणि मराठवाड्यातून शिक्षक मतदारसंघासाठी किरण पाटील यांना उमेदवारी दिली. नाशिक विधानपरिषद संदर्भात लवकरच होणार असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. नाशिक आणि कोकण या दोन जागा शिंदे गटाला हव्या आहेत. परंतु, भाजपने शिंदे गटाशी चर्चा न करता ही नावे निश्चित केली आहे, असे सांगितले जात आहे.
दरम्यान, शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे यांनी मंत्रिमंडळ बैठकीत विधान परिषदेचा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना परस्पर उमेदवार कसे जाहीर केले? असा प्रश्न विचारला. नाशिकची जागा शिंदे गटासाठी असल्याचे दादा भुसे यांचे म्हणणे होते. तीन जागा भाजप आणि दोन शिंदे गट असे सूत्र ठरले असल्याचे दादा भुसे यांनी सांगितले. यावर, देवेंद्र फडणवीस यांनी उमेदवार परस्पर जाहीर झाले नाही. यासंदर्भात निर्णय जाहीर केला तेव्हा उदय सामंत उपस्थित असल्याचे सांगत दादा भुसेंना समजवण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले जात आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"