Maharashtra Politics: दादरच्या शिवाजी पार्कपासून ते कामगार मैदानापर्यंत सकल हिंदू समाजाकडून मुंबईत हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात अनेक हिंदुत्ववादी संघटना तसेच भाजपच्या नेत्यांसह शिंदे गटाचे नेते सामील झाले आहेत. या मोर्चात सहभागी झालेल्या भाजप नेत्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे आता फक्त एमआयएमशी युती करणे बाकी असल्याची टीकाही भाजप नेत्यांकडून करण्यात आली.
लव्ह जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदा राज्यासह देशभरात लागू करावा, श्रद्धा वालकर प्रकरणी आरोपी आफताबला जन्मठेपेची शिक्षा मिळावी, लव्ह जिहाद कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी, या मागणीसाठी सकल हिंदू समाजाकडून शिवाजी पार्क येथून मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात भाजप नेते आशिष शेलार, खासदार मनोज कोटक, किरीट सोमय्या, चित्रा वाघ, आमदार नितेश राणे, आमदार प्रसाद लाड, विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि केशव उपाध्ये, तर शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे, किरण पावसकर आणि सदा सरवणकर उपस्थित होते. या मोर्चात ठाकरे गटातील नेते, आमदार उपस्थित नसल्यावरून भाजपवरून ठाकरे गटावर निशाणा साधण्यात आला.
उद्धव ठाकरे आता फक्त एमआयएमशी युती करणे बाकी
लव्ह जिहादच्या विरोधातील हा मोर्चा काढण्यात आला आहे. हे हिंदू राष्ट्र व्हावे ही आमची मागणी आहे. विधान परिषद आणि विधानसभेत लव्ह जिहादच्या कायद्याची मागणी करणार आहोत. महिलांच्या हितासाठी हा मोर्चा काढला आहे. उद्धव ठाकरेंनी हिंदूत्व सोडले. आता त्यांनी फक्त एमआयएमसोबत युती करणं बाकी आहे. हिंदुत्ववादाच्या विरोधात जाऊन ते राजकारण करत आहेत, अशी टीका आमदार प्रसाद लाड यांनी केली.
महाविकास आघाडीने त्यांच्या काळात हिंदूंच्या सणासुदींवर टाच आणली
महाविकास आघाडीनेही त्यांच्या काळात हिंदूंच्या सणासुदींवरही टाच आणली होती. या सर्व गोष्टींना या मोर्च्यातून उत्तर मिळेल. हिंदूंच्या आडवे कोणी येणार नाही. महाराष्ट्रातील हिंदू जागा होतोय. हिंदून एकत्र येऊन संदेश देणं गरजेचं आहे. गेल्या तीन वर्षात हिंदूंवर अत्याचार होत आहेत. हिंदूंना दाबण्याचा प्रयत्न झाला आहे, असे भाजप आमदार नितेश राणे यांनी सांगितले.
दरम्यान, हिंदू बांधव नाही तर हिंदू भगिनीही इथे आल्या आहेत. आम्ही फक्त हिंदू महिला म्हणून आलो आहोत. महिलांच्या मनातील आक्रोश सांगायला आलो आहोत. राजकारणाचा प्रश्नच येत नाही. इतर राजकीय पक्ष आमच्यावर आरोप करणारच. पण लोकांच्या मनात काय आहे हे सांगणे गरजेचे होते, असे शिंदे गटातील नेत्या शीतल म्हात्रे यांनी म्हटले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"