मुंबई: विधानसभा निवडणुकीसाठीशिवसेना, भाजपामधलं जागावाटप लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. यासाठी 20 ते 25 जागांची अदलाबदल केली जाण्याची शक्यता आहे. जागावाटप करण्यासाठी शिवसेना, भाजपानं फॉर्म्युला निश्चित केला आहे. त्यानुसार जागावाटप करताना दोन्ही पक्षात झालेलं जोरदार इनकमिंग आणि गेल्या दोन निवडणुकांमध्ये मिळालेल्या मतांचा विचार केला जाईल. शिवसेना, भाजपाच्या काही पारंपारिक जागा निश्चित आहेत. मात्र आता यात बदल केला जाईल. त्यामुळे 20 ते 25 जागांची अदलाबदल करण्यात येईल. गेल्या काही दिवसांपासून शिवसेना, भाजपामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी प्रवेश केला आहे. याचा विचार करुन यंदा युतीचं जागावाटप होईल. याशिवाय गेल्या दोन निवडणुकांतील मतदारसंघातील मतदानाची टक्केवारीदेखील विचारात घेण्यात येईल.गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपा, शिवसेनेनं स्वतंत्र निवडणूक लढवली होती. त्यावेळी वडाळा मतदारसंघात भाजपाला अवघ्या 700 मतांनी पराभव स्वीकारावा लागला. काँग्रेसनं ही जागा जिंकली होती. मात्र वडाळ्यात बाजी मारणारे कालिदास कोळंबकर भाजपात दाखल झाले आहेत. त्यामुळे ही जागा भाजपाला मिळू शकते. तर सिल्लोडची जागा शिवसेनेला सोडली जाऊ शकते. 2014 मध्ये अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड मतदारसंघातून विजय मिळवला होती. मात्र काही दिवसांपूर्वीच सत्तार काँग्रेसमधून शिवसेनेत दाखल झाले. अकोलेचे आमदार वैभव पिचड यांनी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत कमळ हाती घेतलं. त्यामुळे ही जागा भाजपाला मिळण्याची शक्यता आहे. तर उस्मानाबादच्या कळंबचे आमदार राणा जगजितसिंह यांच्या भाजपा प्रवेशामुळे हा मतदारसंघदेखील भाजपाला मिळू शकतो. गोरेगावचा मतदारसंघ भाजपाकडून शिवसेनेसाठी सोडला जाऊ शकतो. 2014 मध्ये भाजपाच्या विद्या ठाकूर यांनी शिवसेनेच्या सुभाष देसाईंचा पराभव केला होता. मात्र ही जागा भाजपाकडून सोडली जाऊ शकते.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: भाजपा-शिवसेनेचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला; 'या' जागांची अदलाबदल होणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2019 12:10 PM