नागपूर : गेल्या तीन वर्षात सरकारने महाराष्ट्र उद्ध्वस्त करण्याचे काम केले. सरकारने केलेली कामे दिसलीच नाहीत, म्हणून कोट्यवधी रुपये खर्च करून ‘मी लाभार्थी, हे माझे सरकार’ अशा फसव्या जाहिराती करण्यात आल्या. या सरकारचा सामान्याला लाभच झाला नाही. भाजपा व शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे हे दोन या सरकारचे खरे लाभार्थी आहेत, अशी बोचरी टीका विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधकांनी केली.
विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बंगल्यावर विरोधी पक्षाची बैठक झाली. या बैठकीनंतर संयुक्त पत्रकार परिषदेत विखे पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आदींनी सरकार सर्वच प्रश्नांवर अपयशी ठरल्याचा आरोप करीत सरकारच्या चहापानावर बहिष्कार घालण्याची घोषणा केली. तीन वर्षात सरकार कोणकोणत्या मुद्यांवर अपयशी ठरले याचा एक फलकच विरोधकांनी तयार करून लावला आहे. या फलकाकडे इशारा करीत विखे पाटील म्हणाले, सरकारने दिलेली आश्वासने पाळलेली नाहीत. आता जनता ‘क्या हुवा तेरा वादा..’ असे मुख्यमंत्र्यांना विचारू लागली आहे. जनतेसोबतच आता भाजपाच्या खासदार, आमदारांमध्ये खदखद सुरू झाली आहे. नाना पटोले यांनी खासदारकीचा राजीनामा दिला. ओखी वादळ हे नैसर्गिक संकट होते, तर भाजपाचे सरकार सुलतानी संकट आहे. हे दोन्ही संकट गुजरातमार्गे महाराष्ट्रात दाखल झाले, अशी टीकाही त्यांनी केली.
धनंजय मुंडे म्हणाले, सरकारच्या विविध मंत्र्यांचे विविध घोटाळे आम्ही बाहेर काढले. त्याचे सरकारला पुरावेही दिले. मात्र, सरकारची पारदर्शकता अशी झाली की, विरोधी पक्षाच्या नेत्यांनी मागितलेली फाईल द्यायची की नाही यावर निर्णय घेण्यासाठी तीन सचिवांची समिती नेमली. गुजरातमध्ये जसा ‘विकास’ पागल झाला आहे. तशी महाराष्ट्रात ‘पारदर्शकता’ पागल झाली आहे, अशी बोचरी टीका मुंडे यांनी केली. बोंडअळीमुळे कापूस उत्पादकांचे ३० हजार कोटींचे नुकसान झाले आहे. या शेतकºयांना एकरी २५ हजार रुपयांची मदत देण्याची मागणी मुंडे यांनी केली.
कर्जमाफीच्या याद्या सभागृहात सादर करा
-कर्जमाफीचा घोळ आॅनलाईनमुळे झाला. सरकारने माहिती व तंत्रज्ञान खात्याच्या सचिवांची बदली केली. मात्र, आॅनलाईचे काम करणारी इनोव्हेव कंपनी याची लाभार्थी आहे. तिच्यावर कारवाई झालेली नाही. कर्जमाफीसाठी अर्ज करणाºया शेतकºयांची यादीचे चावडीवर वाचन करून शेतकºयांची इज्जत काढल्या गेली. पण किती शेतकºयांना नेमकी किती कर्जमाफी देण्यात आली याची अद्याप आकडेवारी दिली गेली नाही. सरकारने विधिमंडळ सभागृहात कर्जमाफीच्या याद्या सादर कराव्या, अशी मागणी विखे पाटील व मुंडे यांनी केली. तर, कर्जमाफीची रक्कम जमा करण्यावरून मुख्यमंत्री व सहकारमंत्री वेगवेगळ्या तारखा देत असल्याचे सांगत कर्जमाफीच्या मतदारसंघनिहाय याद्या जाहीर करण्याची मागणी अजित पवार यांनी केली.
यादव सापडत नसेल तर मुख्यमंत्र्यांचा मोबाईल तपासा-
- भाजपचे नेते मुन्ना यादव हे फरार आहेत. त्यांना शोधण्यात पोलिसांना अपयश येत आहेत. यादव सापडत नसेल तर मुख्यमंत्र्यांचे मोबाईल तपासा, म्हणजे यादवांचे लोकेशन कळेल, असा चिमटा मुंडे यांनी गृहखाते स्वत:कडे ठेवलेल्या मुख्यमंत्री फडणवीस यांना काढला. तर यशवंत सिन्हा तुरुंगात व यादव बाहेर, असा सरकारचा कारभार सुरू असल्याची टीका विखे पाटील यांनी केली.
उद्धव ठाकरेंची इशा-यांच्या शतकाकडे वाटचाल-
- उद्धव ठाकरे यांनी आजवर ९३ वेळा सरकारमधून बाहेर पडण्याचे इशारे दिले आहेत. त्यांची शतकाकडे वाटचाल सुरू आहे. यासाठी त्यांचे अभिनंदन करीत विखे पाटील यांनी चिमटा काढला. एकीकडे उद्धव ठाकरे हे देश खड्ड्यात चालला आहे, असे म्हणतात. तर दुसरीकडे खड्डे खोदण्यासाठी मदत करतात. गरज कुणाची आहे, ते स्वत:च्या गरजेसाठी असे बोलतात, असा टोलाही त्यांनी लगावला.
सरकार दिळखोरीकडे : अजित पवार
- राज्य सरकारची वाटचाल दिवाळखोरीकडे सुरू आहे. सरकारकडे विकास कामांसाठी पैसा नाही. जिल्हा नियोजन समितीच्या निधीला ३० टक्क्यांपर्यंत कट लावण्यात येत आहे. कर्जमाफीसाठी रक्कम वळविण्यात आली, असे कारण समोर केले जात आहे. प्रशासनातील महत्वाचे पदे रद्द करून बचत करू पाहत आहेत. यामुळे प्रशसाकीय कामाची गती मंदावली आहे, असा आरोप अजित पवार यांनी केला.