मुंबई - राज्याच्या विधान परिषदेच्या दहा जागांची निवडणूक आज होत असून दहावी जागा महाविकास आघाडीच्या खात्यात जाणार की राज्यसभा निवडणुकीप्रमाणे भाजपा चमत्कार घडवणार याबाबत प्रचंड उत्कंठा लागली आहे. विधान परिषदेच्या वारीत विजयाचा गुलाल कोण उधळणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. याच दरम्यान भाजपा नेते व राज्यसभेचे नवनिर्वाचित खासदार डॉ. अनिल बोंडे (BJP Anil Bonde) यांनी एक सूचक ट्वीट केलं आहे. कोणत्याही राजकीय नेत्याचं थेट नाव न घेता त्यांनी जोरदार निशाणा साधला आहे. "मुख्यमंत्रिपद वाचविण्यासाठी बळी जाणार मिशीवाल्या मावळ्याचा" असं म्हटलं आहे.
अनिल बोंडे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "काळ आला होता भाऊ किंवा भाईवर पण मुख्यमंत्रिपद वाचविण्यासाठी बळी जाणार मिशीवाल्या मावळ्याचा" असं सूचक ट्वीट बोंडे यांनी केलं आहे. बोंडे यांनी केलेल्या या ट्वीटनंतर मिशीवाला मावळा कोण असा प्रश्न अनेकांना पडला आहे. राज्यसभेला झालेल्या चुकीच्या पार्श्वभूमीवर विधान परिषद निवडणुकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विशेष काळजी घेतली आहे. शिवसेनेच्या आमदारांचे पाच-पाच जणांचे गट तयार करण्यात आले असून स्वत: मुख्यमंत्री या आमदारांच्या गटांची भेट घेऊन त्यांना मतदानाबाबत मार्गदर्शन करत आहेत.
शिवसेनेकडून सचिन अहीर, आमशा पाडवी रिंगणात आहेत. तर भाजपाकडून प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उपा खापरे आणि प्रसाद लाड असे पाच उमेदवार निवडणूक लढवत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसनं रामराजे नाईक निंबाळकर आणि एकनाथ खडसे यांना तिकीट दिलं आहे. तर काँग्रेसकडून चंद्रकांत हंडोरे आणि भाई जगताप आपलं नशिब आजमावत आहेत
"महाविकास आघाडीत पूर्णपणे समन्वय असून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे शरद पवार, अजित पवार आणि काँग्रेसचे नाना पटोल, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण यांच्यात उत्तम संवाद आहे. सारी गणितं ठरलेली आहेत आणि याचा निकाल संध्याकाळी तुम्हाला दिसेल" असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तर ज्यांचा काही दिवसांपासून गर्व वाढला आहे, त्यांचा गर्व हरण होण्याचा आजचा दिवस आहे. आजच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे सहाही उमेदवार बहुमताने निवडून येतील, असं विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे.