पुणे : भाजपने 2 कोटी नोकऱ्या निर्माण करण्याचं आश्वासन दिलं होतं, प्रत्यक्षात 2 लाख कंपन्या बंद पडल्या अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भाजपवर केली. पुण्यातील उमेदवारांच्या प्रचारासाठी पुण्यात सभेचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते.
वंचितकडे शहराच्या कचऱ्याचा, वाहतुकीचा प्रश्न सोडवण्याची योजना आहे. शासनाकडे याबाबतचे कुठलेही धोरण नाही. शहरात करण्यात येणारी काचेची बांधकामे आणि टेकड्या बोडक्या केल्याने शहराच्या तापमानात वाढ झाली आहे. मेट्रोपेक्षा वॉटर ट्रान्सपोर्ट पुण्यात सुरू करता आले असते.स्मार्ट सिटी चे केवळ मार्केटिंग झाले. शहर स्मार्ट असतं हे मी पहिल्यांदा ऐकलं. स्मार्ट सिटी म्हणजे काय हे पंतप्रधानांनी सांगावं. असे आंबेडकर यावेळी म्हणाले.
उद्योग वाढवायचे असतील तर यशवंतराव चव्हाण यांची नीती वापरावी लागेल. या सर्व गोष्टी समजणारी व्यक्ती सत्तेत जायला हवी असेही ते यावेळी म्हणाले.