मुंबई - लोकसभा निवडणुकीत शानदार विजय मिळवून विरोधकांना नामोहरम करणारा भारतीय जनता पक्ष देशात सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजपने एकट्याने बहुमताचा आकडा पार केला. त्यामुळे देशातील समस्या सोडविण्यासाठी आवश्यक असलेली शक्ती भाजपमध्ये आली आहे. मात्र अजुनही भाजप मिळालेल्या प्रचंड शक्तीचा वापर काँग्रेसमुक्तीसाठी वाया घालवणार असंच दिसत आहे. महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसमुक्त महाराष्ट्र करण्याची हाक दिली आहे. मात्र त्याचवेळी त्यांनी काँग्रेसयुक्तच्या नाऱ्याला अप्रत्यक्षरित्या पाठिंबाच दिला आहे.
देशातील १८ राज्यांत भाजप सत्तेत आहे. लोकसभेच्या ३०३ जागा भाजपने जिंकून स्पष्ट बहुमत मिळवले आहे. त्यामुळे मित्रपक्ष असो वा नसो भाजपला फरक पडणार नाही. अशा स्थितीत देश चालवणे सोपे होणार आहे. भाजपला येणाऱ्या काळात राज्यसभेतही बहुमत मिळणार असं दिसत आहे. त्यामुळे भाजपने समृद्ध देश, सुजलाम सुफलाम महाराष्ट्र अशी घोषणा देणे अपेक्षीत होते. परंतु, तसं होताना दिसत नाही.
महाराष्ट्र भाजपच्या अध्यक्षपदी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. मंत्रीपद आणि प्रदेशाध्यक्ष पद अशी दोन्ही पदे पाटील यांच्याकडे आहेत. पाटील यांनी देखील 'विधानसभा २२०' असं ध्येय निश्चित असल्याचे म्हटले. त्याचवेळी त्यांनी काँग्रेसमुक्त महाराष्ट्र करण्याचा नारा देताना पुढील ८ ते १० दिवसांत काँग्रेस-राष्ट्रवादीचे अनेक आमदार राजीनामा देऊन भाजपमध्ये सामील होणार असल्याचे नमूद केले. त्यामुळे पाटील यांना काँग्रेसमुक्त महाराष्ट्र म्हणायच होती की, काँग्रेसयुक्त भाजप असा सवाल उपस्थित होत आहे.
देशात आज घडीला काँग्रेस बॅकफूटवर गेलेले आहे. मात्र बॅकफूटवर गेलेल्या काँग्रेसमधील नेत्यांना सत्ताधारी पक्षांत चांगलीच मागणी असल्याचे समजते. या पार्शवभूमीवर भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात आवक वाढली आहे. ही आवक आणखी वाढणार आहे. यामुळे भाजपची आगामी काळातील रणनिती काँग्रेसयुक्त भाजप अशीच होईल, अशी टीका भाजपवर करण्यात येत आहे.