भाजपाने विधानसभेमधील आपल्या मुख्य प्रतोदाच्या नावाची घोषणा केली आहे. भाजपाने आमदार रणधीर सावरकर यांची पक्षाच्या मुख्य प्रतोदपदी नियुक्ती केली आहे. याआधी आमदार आशिष शेलार यांनी भाजपाच्या मुख्य प्रतोदपदाची जबाबदारी सांभाळलेली आहे. आशिष शेलार यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्याने आता त्यांच्या जागी ही जबाबदारी रणधीर सावरकर यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
रणधीर सावरकर हे अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघातून सलग तीन वेळा विजयी झाले आहेत. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत रणधीर सावरकर यांनी अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवताना शिवसेना ठाकरे गटाच्या गोपाल दाटकर यांचा ५० हजार ६१३ मतांनी पराभव केला होता.