मुंबई - भारतीय जनता पार्टीच्या लोकप्रतिनिधींनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी एक महिन्याचे वेतन द्यावे अशी सूचना भाजपा प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती गंभीर झाली आहे. तेथील जनतेच्या बचावासाठी सरकारने प्रभावी काम केले आहे. पूर ओसरल्यानंतर पुनर्वसनाचे अवघड आव्हान आहे. ते पेलण्यासाठी भाजपाने मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजपाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांना निधी संकलनाचे आवाहन केले आहे.
सोमवारी पक्षाचे सर्व खासदार, आमदार, महानगरपालिका सदस्य, जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य यांना पूरग्रस्तांसाठी एक महिन्याचे वेतन देण्याची सूचना केली. सर्व लोकप्रतिनिधींनी ‘भारतीय जनता पार्टी, आपदा कोष’ नावाने आपले चेक किंवा ड्राफ्ट द्यावेत, अशी सूचना त्यांनी केली. तसेच भाजपाच्या कार्यकर्त्यांनी किमान शंभर रुपये तर कमाल हवे तितके योगदान पक्षाकडे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जमा करावे, असेही ते म्हणाले.
दरम्यान,चंद्रकांत पाटील यांनी भाजपातर्फे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी होणाऱ्या कार्यासाठी भाजपा महाराष्ट्र पूरग्रस्त सहाय्यता संयोजक म्हणून माजी प्रदेश संघटनमंत्री रघुनाथ कुलकर्णी यांची नियुक्ती केली आहे. लवकरच समितीची स्थापना करण्यात येईल अशी माहिती दिली आहे.
एकीकडे मदतीचं आवाहन करताना दुसरीकडे मात्र गेल्या सहा दिवसांपासून पुराचा सामना करत असलेल्या कोल्हापुरातील महिलांना भाजपच्या वतीने मुख्यमंत्र्यांच्या नावे राखी विकत घेऊन पाठविण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. पुरात घरादाराची वाताहत झालेल्या निवाऱ्यासह मूलभूत वस्तूंची दैना असताना घरोघरी आलेल्या या पाकिटांबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. भाजपकडून पूरग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळण्याचाच हा प्रकार असल्याची टीका त्यामुळे होत आहे.
मुख्यमंत्र्यांना राख्या पाठविण्याचा भाजपचा फंडा, पूरग्रस्तांच्या जखमेवर मीठ
जुलैत भाजपच्या वतीने रक्षाबंधनानिमित्त ‘सुवर्णबंध महोत्सव’ सुरू करण्यात आला. याअंतर्गत भाजप सरकार सत्तेत आल्यापासून विविध योजनांचा लाभ मिळालेल्या महिलांच्या वतीने मुख्यमंत्र्यांना राज्यातून २१ लाख राख्या पाठविण्याचा निर्णय घेतला होता. त्यातील कांही पाकिटे सोमवारी शाहूनगर वड्डवाडी येथील महिलांना मिळाली आणि पूरग्रस्तांमधून तीव्र नाराजी व्यक्त होऊ लागली आहे.