महापौर पदाची निवडणूक : प्रदेश पातळीवर भाजपच्या आजच्या बैठकीत शिक्कामोर्तबअहमदनगर : नगरमध्ये भाजपांतर्गत दुफळीची परिणिती म्हणून सेना-भाजप युतीत तणाव निर्माण झाला आहे. सोमवारी हा वाद थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचला. सेनेनेच हा वाद मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचविला असून मुख्यमंत्र्यांनी भाजप-सेना युतीला अनुकूलता दर्शविली आहे. भाजप प्रदेश समितीची बैठक मुंबईत मंगळवारी होत असून त्यात युतीवर शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. २१ जून रोजी महापौर पदाची निवडणूक होत आहे. सेनेचे नगरसेवक जास्त असल्याने त्यांचा महापौर तर भाजपचा उपमहापौर हा युतीचा धर्म आहे. त्यानुसार अगोदर चर्चा करून सेनेने मोर्चेबांधणी केली. सत्तेसाठी आवश्यक संख्याबळाची जुळवाजुळव झाल्यानंतर भाजपमध्ये उपमहापौर पदावरून रस्सीखेच सुरू झाली. आगरकर व गांधी गटातील या रस्सीखेचात सेनेचा जीव टांगणीला लागला. उपमहापौर पद मिळत नसल्याचे दृष्टीपथास येताच गांधी गटाच्या नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी महापौर पदासाठीची व्यूहनिती जाहीर करत आघाडीचा पाठिंबा मिळविण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यामुळे सत्तेचे टाकलेले फासे पलटतात की काय, याची भिती सेनेत निर्माण झाली. त्यातच आगरकर-गांधी गटाची धूसफूस काही केल्या शमेना. सोमवारी सेनेनेच हा वाद थेट मुख्यमंत्र्यांपर्यत ‘खास दुता’मार्फत पोहचविला. मुख्यमंत्र्यांसमोर नगरमधील सर्व राजकीय परिस्थिती कथन करण्यात आल्यानंतर त्यांनी भाजप-सेना युतीला अनुकुलता दर्शविली. सोमवारी भाजप नगरसेवकांची बैठक मुंबईत प्रदेशाध्यक्षांसोबत होणार आहे. त्यात हा निर्णय जाहीर होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली. कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या ७ नगरसेवकांना सेनेने गळाला लावले आहे. हे नगरसेवक महापौर पदाच्या निवडणुकीत गैरहजर राहणार आहेत. त्यामुळे आघाडीचे संख्याबळ घटून सेनेचे पारडे जड झाले आहे. सत्ता दृष्टीपथास असतानाच भाजपमधील अंतर्गत वादामुळे सेनेत चिंता निर्माण झाली. मात्र, सोमवारी दुपारनंतर ती काहीशी कमी झाली. मंगळवारी प्रदेशाध्याक्षांसोबत बैठक झाल्यानंतर तसा निर्णय जाहीर होईल. मात्र, ऐनवेळी गांधी गटाने नगरमध्ये संमत केलेला नवीन प्रस्ताव ठेवलाच तर ‘प्रदेश’ काय निर्णय घेतो, याची उत्सुकता राजकीय वर्तुळात लागून आहे. (प्रतिनिधी)भूतकर, ठाणगे, बारस्कर नगरमध्ये?सेनेसोबत मुंबई सहलीवर रवाना झालेल्या सेनेच्या नगरसेविका मनिषा बारस्कर तसेच अपक्ष सारीका भूतकर व उषा ठाणगे या सोमवारी नगरमध्ये आल्याची चर्चा शहरभर पसरली. त्यांनी सेनेची साथ सोडल्याची चर्चाही सुरू झाली. त्यामुळे आघाडीच्या आशा काही काळ पल्लवीत झाल्या. मात्र, बारस्कर या खासगी कामानिमित्त नगरमध्ये आल्या आहेत तर भूतकर, ठाणगे यांच्यासोबत सेनास्टाईल बंदोबस्त देण्यात आला आहे. खासगी काम आटोपून या दोघीही पुन्हा मुंबईत पोहचतील, असे सूत्रांकडून सांगण्यात आले. भाजप नगरसेवकांची बैठक प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासोबत मंगळवारी दुपारी एक वाजता होणार आहे. प्राप्त माहितीनुसार भाजप नगरसेवक निर्णय नसताना सेनेसोबत गेलेच कसे? असा मुद्दा उपस्थित करत गांधी गटाने आगरकर गटाच्या नगरसेवकांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, शहर जिल्हाध्यक्ष खासदार दिलीप गांधी यांच्यासोबत बैठकीत सेना युतीचा निर्णय झाला, त्यानंतरच सहलीवर रवाना झाल्याचा दावा आगरकर गटाच्या नगरसेवकांनी केला.डागवाले-भोसलेंची बैठकमनसेचे पण सेनेत प्रवेश केलेले नगरसेवक किशोर डागवाले व मनसेचे गटनेते तथा स्थायी समितीचे सभापती गणेश भोसले यांच्यात सोमवारी प्रदीर्घ बैठक झाली. या बैठकीत पक्षाचे चारही नगरसेवक एकत्र राहणार असून ते एकत्रित मतदान करतील, असे स्पष्ट करत गणेश भोसले हे आमच्या सोबत असल्याचे डागवाले यांनी स्पष्ट केले. भोसले यांनी मात्र प्रदेश देईल त्यानुसार भूमिका घेणार असल्याचे सांगत नगरच्या राजकीय स्थितीचा अहवाल पक्षाचे सरचिटणीस अविनाश अभ्यंकर व नगरचे संपर्कप्रमुख शिरीष सावंत यांना दिला आहे. ते देतील त्यानुसार महापौर पदाच्या निवडणुकीत भूमिका घेऊ, असे भोसले यांनी स्पष्ट केले.
भाजप-सेना युतीला मुख्यमंत्री अनुकूल?
By admin | Published: June 13, 2016 11:07 PM