उस्मानाबाद : दुष्काळाचे अनिष्ट चक्र भेदण्यासाठी दीर्घकालीन तसेच तातडीच्या उपाययोजना हाती घेणे गरजेचे आहे. परंतु, भाजपा-शिवसेना युतीकडून प्रत्यक्षात कुठलीही कामे होताना दिसत नाहीत. हे शासन केवळ घोषणाबाज असून सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरल्याची घणाघाती टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी येथे केली.जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त गावांतील शेतकऱ्यांशी चव्हाण यांनी संवाद साधला. त्यानंतर येथील सर्किट हाऊसमध्ये त्यांनी पत्रकार परिषद घेतली. चव्हाण म्हणाले, कृषी कर्जाचे पुनर्गठन करण्यास शेतकरी उत्सुक नाहीत. सततच्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांमध्ये कर्ज फेडण्याची ऐपत राहिलेली नाही. त्यामुळे शासनाने कर्जाचे पुनर्गठन करण्याऐवजी कर्जमाफी द्यावी. खरीप हंगाम तोंडावर आला आहे. मात्र, पेरणीसाठी लागणारे बी-बियाणे व खत खरेदी करण्यापुरतीही कुवत शेतकऱ्यांत नाही. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना विनामूल्य बियाणे व खताचा पुरवठा करावा.अधिकारी ऐकत नाहीत, असे खुद्द मुख्यमंत्रीच सांगत असतील तर जनतेने दाद कोणाकडे मागायची? जर अधिकारी ऐकत नसतील, त्यांना घरचा रस्ता का दाखवित नाहीत, असा सवाल चव्हाण यांनी केला. (प्रतिनिधी)अनुदानातून १०० रुपयांची कपातजिल्हा बँकेकडून निराधारांच्या अनुदानातून प्रत्येकी शंभर रूपये कपात केले जात आहेत. बँकेची ही कृती चुकीची असल्याचे सांगत हे पैसे कोणाच्या खिश्यात जातात?, असे चव्हाण यांनी विचारले. सरकार पावसाची वाट बघतेयदिवसागणिक दुष्काळी परिस्थिती अधिक तीव्र स्वरूप धारण करीत आहे. त्यामुळे कर्जमाफीसोबतच अन्य उपाययोजना हाती घेणे गरजेचे आहे. परंतु, हे शासन पाऊस कधी पडेल त्याची वाट बघत आहे. पाऊस पडला की शेतकरी सर्व विसरतील, असे शासनकर्त्यांना वाटत असल्याचे चव्हाण म्हणाले.
भाजपा-सेना सरकार अपयशी
By admin | Published: May 08, 2016 2:21 AM