मुंबई : मतदानाचा दिवस जसजसा जवळ येत आहे, तसतसे राजकीय वातावरणही तापत असल्याचा प्रत्यय बुधवारी सायन कोळीवाड्यात आला. परिसरात काढण्यात आलेल्या भाजपाच्या प्रचार फेरीवर मनसे आणि शिवसेनेने आक्षेप घेतला. त्यानंतर तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमनेसामने येऊन त्यांच्यात तुफान शाब्दिक चकमक झाली. पुढे याचे रूपांतर हाणामारीत झाल्याने परिसरात तब्बल एक ते दीड तास तणाव निर्माण झाला होता. मात्र पोलिसांनी मध्यस्थी करत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. यामध्ये पोलिसांना धक्काबुक्की झाल्याने प्रकरण अधिकच चिघळले.सायन कोळीवाडा येथील भाजपा उमेदवाराने प्रचारासाठी पुणे येथील बालाजी कॉलेजमधून १०० ते १५० विद्यार्थी प्रचारासाठी बोलावले होते. सुटाबुटात आलेले हे विद्यार्थी घरोघरी जाऊन प्रचार करत होते. ही बाब तेथील शिवसेना आणि मनसेच्या उमेदवारांना समजताच त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना पुढे धाडले. प्रचाराची परवानगी घेतली होती का, असा सवाल उपस्थित करत मनसेच्या कार्यकर्त्यांनी यातील काही प्रचारकांना त्यांच्याच कार्यालयात डांबले. थोड्या वेळात शिवसैनिकही तेथे जमले. ही बाब भाजपा उमेदवाराला समजताच तेथे भाजपाचे पदाधिकारी दाखल झाले. त्यांनीही या प्रकाराला विरोध दर्शवला. तिन्ही पक्षांतील कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक वाढली. शिवीगाळीबरोबरच एकमेकांविरुद्ध घोषणाबाजीचा सूर वाढला. पुढे याचे रूपांतर हाणामारीत झाले. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त एन. अंबिका, अॅण्टॉप हिल पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक नासीर ए. अब्दुल एच. शेख पोलिसांसह तेथे दाखल झाले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. यामध्ये काही कार्यकर्त्यांना पोलीस व्हॅनमध्ये भरले. याच रागात त्यांनी पोलिसांसोबतही झटापट केली. यामध्ये फौजदार मोहिते जखमी झाले आहेत. कार्यकर्त्यांना तत्काळ अॅण्टॉप हिल पोलीस ठाण्यात आणण्यात आले. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता. (प्रतिनिधी)
भाजपा-सेना-मनसेत राडा
By admin | Published: February 16, 2017 5:13 AM