Maharashtra Lok Sabha Election 2024 BJP Vs Congress: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. महायुती आणि महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला अद्याप ठरलेला नाही. महायुतीत खटके उडणे सुरूच आहे, महाविकास आघाडीतही तणाव आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वातील वंचित बहुजन आघाडी आता महाविकास आघाडीसोबत जाण्याची शक्यता अगदीच कमी आहे. यातच नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छूक नसल्याचे म्हटले जात आहे. यावरून भाजपाकडून टीका करण्यात आली आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि काँग्रेसचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना या लोकसभा निवडणुकीत उमेदवारी मिळण्याची शक्यता असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मात्र, हे दोन्ही नेते लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छूक नसल्याचे सांगितले जात आहे. विजय वडेट्टीवारांच्या कन्या आणि युवक काँग्रेसच्या प्रदेश महासचिव शिवानी वडेट्टीवारांनी चंद्रपूर लोकसभेसाठी लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यासाठी त्यांनी दिल्ली गाठत आपले म्हणणे पक्षश्रेष्ठींसमोर मांडले आहे. या घडामोडींवरून भाजपा नेते आशिष देशमुख यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला.
पराभवाच्या भीतीने पटोले, वडेट्टीवार निवडणूक मैदानातून पळ काढतायत
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले असतील किंवा काँग्रेसचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार असतील, यांना या निवडणुकीत पराभवाची मोठी भीती असल्यामुळे निवडणुकीच्या मैदानातून पळ काढत आहेत. किंबहुना पळून जाण्याचे या नेत्यांचे प्रयत्न आहेत. संपूर्ण महाराष्ट्रातील काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये पराजित मानसिकता भरलेली आहे. म्हणूनच नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी नकार देत आहेत, अशी टीका आशिष देशमुख यांनी केली.
दरम्यान, विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात भाजपाचा मोठा विजय होईल. या लोकसभा निवडणुकीत ४५ हून अधिक जागा महायुतीला मिळतील, असा विश्वास आशिष देशमुख यांनी व्यक्त केला.