Maharashtra Politics: भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारवर गंभीर आरोप करत, मोठा गौप्यस्फोट केला. यानंतर राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहे. महाविकास आघाडीचे नेते भाजपवर टीका करताना दिसत असून, भाजप नेते महाविकास आघाडीवर पलटवार करताना दिसत आहेत. यातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी केलेल्या टीकेला भाजप नेते आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
या वक्तव्यावर सुप्रिया सुळेंनी नाराजी व्यक्त करताना, देवेंद्रजी आपस ये उम्मीद न थी. अशा खोट्या नाट्या गोष्टी पसरवण्यापेक्षा पुण्यात कोयता गॅंग, धायरीत गोळीबार झाला अशा घटना घडल्या आहेत. राज्याचे गृहमंत्री म्हणून त्यांनी यावर बोलणे अपेक्षित होते. त्यांना विनम्र विनंती आहे की, पुण्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. सगळीकडे गुन्हेगारी वाढत आहे. अशी परिस्थिती त्यांनी यावर बोलावे, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले. यावर भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
सुप्रियाताईंनी पुन्हा एकदा गजनी सिनेमा पाहावा
सुप्रियाताईंनी पुन्हा एकदा गजनी सिनेमा पाहावा अशी माझी इच्छा आहे. कारण त्या सिनेमात शॉर्ट मेमरीचा आजार असल्याचे दाखवले आहे. ताईंना असा आजार होऊ नये, अशी माझी इच्छा आहे. कारण त्यांची वक्तव्य त्याच पद्धतीची दिसतायत. मी पूर्ण यादी वाचून दाखवेन ताईंना. सूडाच्या राजकारणाची भूमिका टोकापर्यंत नेणारे सरकार म्हणजे उद्धव ठाकरेंचे, शरद पवार आणि काँग्रेसच्या समर्थनाचे सरकार होते, अशी टीका आशिष शेलार यांनी केली.
देवेंद्र फडणवीसांचे नाव लिहिण्याचा त्यांनी प्रयत्न केला
देवेंद्र फडणवीस म्हणाले की त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न ठाकरे सरकारने केला. याचा साक्षीदार मी स्वत: आहे. त्या काळात २५० पानांचा अहवाल तत्कालीन आयुक्त संजय पांडे यांनी त्यांच्या खासगी जागेत ठेवलेला आणि नंतर सार्वजनिक कार्यालयात आणला. तो अहवाल मी स्वत: वाचला आहे. त्यात कुठल्या पानावर देवेंद्र फडणवीसांचे नाव लिहिण्याचा त्यांनी प्रयत्न केला, हे मी स्वत: वाचले आहे. एका गोष्टीच्या चौकशीत दुसरी गोष्ट आणणे हे काम तत्कालीन आयुक्तांकडून करून घेण्याचा प्रयत्न हे त्या वेळच्या गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांचेच पाप होते. कुणाला सुडाचे राजकारण सांगताय ताई? अशी विचारणा आशिष शेलार यांनी केली आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"