Ashish Shelar Vs Sanjay Raut: धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेत अदानी ग्रुपच्या कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला. धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. याला भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिले.
अडवणूक आंदोलन कधी मोर्चा, मुंबईत उबाठाबाबत एकच चर्चा, धारावीतून निकालेंगे मातोश्री टू का खर्चा, अशी खोचक टीका आशिष शेलार यांनी पत्रकारांशी संवाद साधताना केली. धारावीतून निघणारा ठाकरे गटाचा मोर्चा होऊ नये. तो थांबावा, यासाठी दिल्लीतून दबाव आहे, असा दावा संजय राऊत यांनी केला होता. याबाबत आशिष शेलार यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर, तुमच्यावर कोणाचा दबाव होता मग? तुमच्यावर शरद पवारांचा दबाव होता का? पवारांनी दिल्लीतून फोन केला होता का? असा प्रतिप्रश्न आशिष शेलार यांनी केला.
टीडीआर घोटाळा असेल तर सर्वस्वी पाप उद्धव ठाकरेंचे आहे
धारावी पुनर्विकास प्रकल्प हा देशातील सर्वांत मोठा टीडीआर घोटाळा होताना आम्हाला दिसतोय, असा आरोप संजय राऊतांनी केला होता. यावर बोलताना, या टेंडरच्या अटी, कार्यपद्धतीचे आणि त्याबाबतीतील धोरणात्मक निर्णय उद्धव ठाकरेंच्याच काळात झाले आहेत. टेंडरमध्ये गडबड असेल, टीडीआर घोटाळा असेल तर सर्वस्वी पाप उद्धव ठाकरे यांचेच आहे. ५०० फुटांची घरे हवी होती मग उद्धव मुख्यमंत्री होतात तेव्हा टेंडरमध्ये अट घालायची होती. तेव्हा का नाही घातली? आज तुम्हाला उपरती का झाली? अशी विचारणा आशिष शेलार यांनी केली.
दरम्यान, मुंबईला आणि राज्याला काही विकासातून मिळाले की ज्यांची पोटदुखी होते ते म्हणजे उबाठा. त्यामुळे त्यांच्या पोटदुखीचा हा कार्यक्रम आहे. गांजा, ड्रग्जबाबत संजय राऊत यांनी केलेल्या आरोपात काही तथ्य नाही, अशी टीका आशिष शेलार यांनी केली. तत्पूर्वी, धारावी पुनर्विकास प्रकल्प हा देशातील सर्वांत मोठा टीडीआर घोटाळा होताना आम्हाला दिसतोय. धारावी पुनर्विकास प्रकल्प हा या देशातील टीडीआर प्रकल्प आहे. धारावी वाचवा म्हणजे मुंबई वाचवा. धारावी हा पहिला घास आहे आणि त्यानंतर मुंबई गिळण्याचे गुजराती लॉबीचे फार मोठे कारस्थान आहे. गुजरात मॉडेल जबरदस्त पद्धतीने पुढे जात आहे, या शब्दांत संजय राऊत यांनी टीका केली होती.