BJP Ashish Shelar News: २०२४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्रिपद न मिळाल्याने त्यांच्या नाराजीच्या बातम्या समोर आल्या होत्या. त्यात अजित पवारही उघडपणे मुख्यमंत्री बनण्याची इच्छा व्यक्त करत असतात. काँग्रेसचे नेते आमदार नाना पटोले यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार दोघांनाही मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली. यानंतर राजकीय वर्तुळात अनेक प्रतिक्रिया उमटल्या असून, भाजपा नेत्यांनी नाना पटोलेंवर पलटवार केला आहे.
एकनाथ शिंदे आणि अजित पवार दोघांनीही सतर्क राहिले पाहिजे. आम्ही सोबत आहोत. आमच्याकडे त्यांनी यावे, आम्ही त्यांना पाठिंबा देऊ. सध्या दोघांमध्ये मुख्यमंत्रिपदाची ओढ लागली आहे. काही दिवस एकाला, काही दिवस दुसऱ्याला या दोघांनाही मुख्यमंत्री बनवू. भाजपाच्या पाठिंब्यावर ते मुख्यमंत्री होऊ शकत नाहीत. आम्ही त्यांना मुख्यमंत्री बनवू शकतो असे नाना पटोले यांनी म्हटले होते. यानंतर आता भाजपा नेते आशिष शेलार यांनी नाना पटोले यांच्यावर टीका केली आहे.
नाना पटोले देणारे कोण? एकनाथ शिंदेंना शिकवण्याची गरज नाही
नाना पटोले देणारे कोण आहेत? त्यांच्या झोळीत काय आहे जिसकी झोली खाली वो बात कर रहा है, त्यांच्याकडे आकडे ना नेते त्यांच्या पक्षातील लोक त्यांना नाही ऐकत. याउलट एकनाथ शिंदे हे विचारासठी लढणारे नेतृत्व आहे, हे देशाने पाहिले आहे. त्यांनी केलेला उठाव हा बाळासाहेबांसारखा केलेला उठाव आहे. उद्धव ठाकरेंसारखे खुर्ची आणि सत्तेसाठी केलेला उठाव नाही. नाना पटोले यांनी एकनाथ शिंदे यांना शिकवण्याची गरज नाही, अशी टीका आशिष शेलार यांनी केली.
दरम्यान, संजय राऊतांच्या मेंदूचे दोन भाग झालेत, डोक्यात भुसा भरला आहे. त्यांना सत्तेची भूक आहे. अराष्ट्रीय भावनेला मतासाठी खतपाणी घालतात ते कोणाकडे आहेत? याचे उत्तर संजय राऊत यांनी द्यावे. भाजपा, एनडीए, अमित शाह, नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार. दोन भाग एवढेच आहेत राष्ट्रीय आणि अराष्ट्रीय. जो राष्ट्रीय भावनेने काम करतो त्यांच्यासोबत आम्ही आहोत. संजय राऊत यांच्या बोलण्याला काही महत्त्व नाही, असा टोला शेलारांनी लगावला.