‘इंडिया’ आघाडीच्या आतापर्यंत दोन बैठका झाल्या. मुंबईत तिसऱ्या बैठकीचे आयोजन आज व उद्या होत आहे. देशात कायद्याचे राज्य नाही. मणिपूर, जम्मू–कश्मीर, महाराष्ट्रात लोकशाही नाही. न्यायालयास प्रतिष्ठा नाही व केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून भयाचे साम्राज्य उभे केले गेले आहे. देशातील हे भयाचे साम्राज्य उलथवून टाकण्यासाठी ‘इंडिया’ आघाडीची पाऊले मजबुतीने पडत आहेत. चीनपुढे गुडघे टेकणाऱ्या आजच्या भारतास विजयी करण्यासाठी ही ‘इंडिया’ची वज्रमूठ सज्ज आहे, असा ठाम विश्वास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
‘इंडिया’ आघाडीच्या या बैठकीवरून भाजपाने हल्लाबोल केला आहे. "मुंबईत डरपोकांचा मेळावा "घमेंडीया" नावाने संपन्न होत आहे" असं म्हणत निशाणा साधला आहे. भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी टीकास्त्र सोडलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबतचे वृत्त दिले आहे. "पंगती बसू दे आणि जेवणावळीही उठू दे... फक्त काल-परवा पर्यंत स्वाभिमानाने जगणाऱ्यांना... महाराष्ट्र द्रोह्यांच्या उष्ट्या पत्रावळ्या उचलताना जनाची नाही, किमान मनाची तरी वाटू दे!" असं म्हणत घणाघात केला आहे.
"मुंबईत डरपोकांचा मेळावा "घमेंडीया" नावाने संपन्न होत आहे.◆ज्यांनी ज्यांनी काल-परवा पर्यंत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्राचा द्वेष केला...◆ज्या काँग्रेसने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा अपमान केला, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात हुतात्म्यांवर गोळ्या झाडल्या◆◆अशा सगळ्यांचे महाराष्ट्रात उबाठा वाजत गाजत जोरदार स्वागत करीत आहे.◆◆महाराष्ट्राचा द्वेष करणाऱ्यांना मोदक आणि पंचपक्वान्नाचे पंचतारांकित जेवण घालून त्यांची तोंडं गोड करीत आहेत.●● पंगती बसू दे आणि जेवणावळीही उठू दे... फक्त काल-परवा पर्यंत स्वाभिमानाने जगणाऱ्यांना... महाराष्ट्र द्रोह्यांच्या उष्ट्या पत्रावळ्या उचलताना जनाची नाही, किमान मनाची तरी वाटू दे!" असं आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
राज्यांचा स्वाभिमान, प्रांतांची अस्मिता, सर्वच धर्मांचा मान राखून एक व्यक्ती व त्यांचे धनिक मित्रमंडळ नव्हे, तर भारत देश शक्तिमान व्हावा यासाठी ‘इंडिया’चा गरुड पक्षी झेपावला आहे! मुंबईतील बैठकीचा तोच संदेश आहे! भाजपने इंडिया आघाडीची इतकी धास्ती घेतली की, स्वयंपाकाचा गॅस २०० रुपये स्वस्त केला. बैठका वाढत जातील तशी ही स्वस्ताई वाढत जाईल. ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीची ही कमाल आहे. ‘इंडिया’ सत्तेवर आल्यावर काय घडेल याची ही चुणूक आहे. ‘इंडिया’ आघाडीच्या मुंबईतील बैठकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. देशभरातील प्रमुख नेते मुंबईत उतरले आहेत. संतापाच्या ठिणगीतून ‘इंडिया’ आघाडीचा जन्म झाला आहे. पंतप्रधान मोदी हे अचानक विश्वगुरू बनले आहेत, अशी टीका ठाकरे गटाने सामना अग्रलेखातून केली आहे.