मनोज जरांगे यांच्या संरक्षणाची जबाबदारी ही देवेंद्र फडणवीसांची आहे. यामागचा बोलवता धनी कोण हे जर गृहमंत्र्यांना माहिती नसेल तर फडणवीसांनी राजीनामा दिला पाहिजे असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. यावरून भाजपाने राऊतांवर जोरदार निशाणा साधला आहे. "गट केवढा, आणि आवाज केवढा?, पराभव अटळ; तुमच्या अहंकाराचा फुगा फुटणार" असं म्हणत खोचक टोला लगावला आहे.
भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी "ही तर तुमची अखेरची घरघर!" असं म्हणत टीकास्त्र सोडलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "ही तर तुमची अखेरची घरघर! पक्ष गेला, चिन्ह गेले, खासदार, आमदार, कार्यकर्ते, पदाधिकारी, नगरसेवक गेले... जो शिल्लक गट दिसतोय ते घेऊन पत्रकार पोपटलाल जो थयथयाट करीत आहेत, तो म्हणजे त्यांच्या गटाची अखेरची घरघर! गट केवढा, आणि आवाज केवढा? पण, अखेरच्या घरघरीचा आवाज मोठाच असतो म्हणा!"
"2024 नंतर महाराष्ट्रात भाजपा कुठे असेल? याची चिंता तुम्ही करु नका! छोट्या मोठ्या 22 पक्षांना एकत्र घेऊन चालणारा पक्ष म्हणजे भाजपाच आणि तुमच्या पक्षा सारख्या बांडगूळाना दिल्ली दाखवली ती सुध्दा भाजपानेच ! तुमचा सडकून पराभव अटळ आहे. तुमच्या अहंकाराचा फुगा फुटणार हे निश्चित आहे. तुम्ही तुमच्या गटासाठी नँनो गाडी तेवढी बुक करुन ठेवा!!" असं आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करत मुंबईतील सागर बंगल्याकडे कूच केली होती. अंतरवाली सराटीतून भांबेरीपर्यंत गेले असून, रविवारी रात्री समाज बांधवांच्या विनंतीनुसार भांबेरी गावात थांबले. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात रविवारी मध्यरात्री १ वाजल्यापासून जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार संचारबदी लागू करण्यात आली. त्याचबरोबर मनोज जरांगे यांच्या एका सहकाऱ्यासह ५ जणांना रात्रीच पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यानंतर, आज सकाळी जरांगे यांनी पुन्हा अंतरवाली सराटी गावात येऊन आंदोलनस्थळ गाठले. तसेच, पुढील काही तासांत मुंबईला जाण्यासंदर्भात भूमिका स्पष्ट करणार असल्याचंही त्यांनी म्हटलं.