संजय राऊत यांनी "भाजपाने आधी शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे हे नाव संपवण्याचा प्रयत्न केला. आता ते शरद पवार यांच्या राजकीय कारकीर्दीला धक्का लावण्याचा प्रयत्न करत आहेत. जे लोक इतिहास घडवत नाहीत ते दुसऱ्यांचे इतिहास नष्ट करण्याचे प्रयत्न करत असतात. पण कितीही प्रयत्न केला तरी त्यांनी तसे करता येणार नाही. बाळासाहेबांचा, शरद पवारांचा इतिहास पुसला जाणार नाही" असा स्पष्ट इशारा भाजपाला दिला. यानंतर भाजपाने आता जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
"जर विश्वविख्यातांनी काढला, नसता आमचा बाप तर झाला नसता तुमच्या मालकांना हा एवढा ताप" असं म्हणत हल्लाबोल केला आहे. तसेच "विश्वविख्यात प्रवक्ते, शापित दरबारी प्रभादेवीच्या गल्लीत बसून सांगतात की हा दिल्लीचा डाव?" असं म्हणत खोचक टोला लगावला आहे. भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी टीकास्त्र सोडलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे.
"...या प्रस्तुत प्रसंगी "जाणता राजा" हरला नाही, तर तो जिंकला... हे सांगण्यासाठी दरबारी राजकारणात "भाट" ठेवलेले असतातच... वेगवेगळ्या "माध्यमातून" भाट आपलं काम चोख करीत आहेत. विश्वविख्यात प्रवक्ते आणि शापित दरबारी प्रभादेवीच्या गल्लीत बसून सांगतात की, हा तर दिल्लीचा डाव..? आमचं पुन्हा पुन्हा एकच म्हणणं जर विश्वविख्यातांनी काढला, नसता आमचा बाप तर झाला नसता तुमच्या मालकांना हा एवढा ताप!" असं आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
आशिष शेलार यांनी याआधी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता. "अहंकारी राजा आणि विलासी पुत्र एक विश्वविख्यात दरबारात... नॅनोत मावेल एवढेच उरले पदरात! ज्यांनी काढला आमचा बाप तेच उरले आज एक फुल दो हाफ!" असं शेलार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं. यासोबतच "झाला मोह "जाणत्या राजांना" याच संजयाचा, अखेर बसला फटका त्यांनाही शापित दरबाऱ्याचा, आम्ही सांगतं होतो वारंवार यांना आवरा कि हो, या तुमच्या विश्वविख्यातांना, आता बांधा पुतळा या तुमच्या विश्वविख्यातांचा, यापेक्षा काय सन्मान करणार या शापित दरबाऱ्यांचा!" असं देखील आशिष शेलार यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं.