मुंबई - पत्राचाळ पुनर्विकास गैरव्यवहारप्रकरणी ईडी कोठडीत असलेले शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांना सोमवारी विशेष पीएमएलए न्यायालयाने २२ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. राऊत यांना औषधे आणि घरचे जेवण देण्याची परवानगी न्यायालयाने दिली. त्यांची रवानगी आर्थर रोड जेलमध्ये करण्यात आली आहे. राऊत यांची ईडी कोठडी ८ ऑगस्टला समाप्त झाली. ईडीने सोमवारी राऊत यांना विशेष न्यायालयात उपस्थित केले. राऊत यांच्या अतिरिक्त कोठडीची आवश्यकता नसल्याचे ईडीतर्फे विशेष न्यायालयाला सांगण्यात आले. त्यानंतर न्यायमूर्ती एम. जी. देशपांडे यांनी राऊत यांची प्रकृती विचारात घेत त्यांना २२ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. यानंतर आता भाजपाने राऊतांना खोचक टोला लगावला आहे.
"उखाड देंगे बोलणारे आता जेलमध्ये" असं म्हणत जोरदार निशाणा साधला आहे. भाजपाचे नेते आशिष शेलार (BJP Ashish Shelar) यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना संजय राऊतांवर टीकास्त्र सोडलं आहे. "ज्यावेळी एखादा पक्ष बलवान होतो. तेव्हा बाकिच्यांना स्पेस कमी होते. भारतीय जनता पक्षाने कुठलाही पक्ष संपवणे, फोडणे, उखाडणे असं म्हटलेलं नाही. उखाड देंगे म्हणणारे आता जेलमध्ये गेलेत. संपवण्याची भूमिका बोलणारे कोण? त्यांची वाताहत झालीय़. भाजपाने हे सर्व सहन केलं. असा विचारही कधी भाजपाने केला नाही. इंडिया म्हणजे आम्ही आणि आम्ही म्हणजे इंडिया हे बोलणाऱ्यांनी आम्हाला शहाणपणा शिकवू नये" असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी असं म्हटलं.
बिहारच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. भाजपाशी असलेली आघाडी तोडून नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा लालूंच्या आरजेडीसोबत जवळीक साधली आहे. आता नितीश कुमार यांनी राज्यपालांची भेट घेत आरजेडीच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन करण्याची घोषणा केली आहे. या संपूर्ण घडामोडींमध्ये भाजपाचा गेम झाल्याचे दिसत आहे. एवढ्या घडामोडी घडत असताना भाजपा त्यापासून अनभिज्ञ कसा काय राहिला. बिहारमधील घडामोडींकडे भाजपानं दुर्लक्ष केलं की कुठलाच पर्याय नसल्याने जे घडतंय ते पाहत राहण्याची हतबलता भाजपावर आली, असा प्रश्न उपस्थित होत आहे. याच दरम्यान भाजपाने उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
"नितीश कुमार ज्या मार्गावर चालले आहेत, त्याला राजकारणातला उद्धव मार्ग म्हणतात"
राजकारणातला उद्धव मार्ग असं म्हणत डिवचलं आहे. भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ (BJP Chitra Wagh) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "नितीश कुमार ज्या मार्गावर चालले आहेत, त्याला राजकारणातला उद्धव मार्ग म्हणतात" असं म्हटलं आहे. गेल्या दोन महिन्यांपासून महाराष्ट्रात घडत असलेल्या घडामोडी राजकीय चर्चांचे केंद्र बनल्या होत्या. भाजपाने आपलं सगळं लक्ष महाराष्ट्रातील सत्तांतरावर केंद्रित केलं होतं. त्यातूनच भाजपाने एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीला बळ दिलं.