राज्यात झालेल्या ५४७ ग्राम पंचायतींमधील निवडणुकांचा आज निकाल हाती आला आहे. यामध्ये भाजपाने ३०० हून अधिक ग्रा. पंचायतींवर वर्चस्व स्थापित केल्याचा दावा केला आहे. हा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. तसेच जनतेने शिंदेंची शिवसेना आणि भाजपाच्या युतीला स्वीकारल्याचे ते म्हणाले. यानंतर आता भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी या निकालावरून शिवसेनेला खोचक टोला लगावला आहे. "राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा स्व. बाळासाहेबांच्या शिवसेनेला संपविण्याचा घाट घालत आहे, आतातरी उद्धव ठाकरे यांचे डोळे उघडतील, अशी आशा करुयात" असं म्हटलं आहे.
आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाला राज्यभरात अभुतपूर्व यश मिळाले आहे. भाजपा हा राज्यातील क्रमांक एकचा पक्ष झाला असल्याचे आतापर्यंतच्या आकडेवारीतून दिसत आहे. महाराष्ट्रातील जनता आणि मराठी माणसामुळेच हे यश भाजपाला मिळाले असून आम्ही नम्रतेने हा विजय स्वीकारतो. जनतेची सेवा आणखी दुप्पट वेगाने करू"असा विश्वास व्यक्त करतो असं म्हटलं आहे.
"शिवसेना पक्ष चौथ्या क्रमांकावर गेला”
"राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा स्व. बाळासाहेबांच्या शिवसेनेला संपविण्याचा घाट घालत आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी पक्ष हा राज्यातला दोन नंबरचा पक्ष झाला असून शिवसेना पक्ष चौथ्या क्रमांकावर गेला आहे. हीच भीती, संशय आणि आरोप एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी वारंवार उद्धव ठाकरेंना सांगितला होता. राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेला संपवू पाहत आहे, हे आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे. आतातरी उद्धव ठाकरे यांचे डोळे उघडतील, अशी आशा करुयात" असं देखील म्हटलं आहे.
रामदास कदम यांचे आरोपी गंभीर
"रामदास कदम यांचा आदित्या ठाकरेंवरील आरोप गंभीर आहे. कदम हे विरोधी पक्षनेते होते, त्यांनी आरोप केलेला कार्यकाळ हा त्याच पक्षातला आहे. त्यामुळे कदम यांचा आरोप गंभीर आहे. या आरोपातून आपली बाजू स्वयंस्पष्ट करायची असेल तर आदित्य ठाकरे यांनी स्वतःहून चौकशीला सामोरे गेले पाहीजे" असंही आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.